उमेदवारीवरून सांगली कॉँग्रेसमध्ये अस्वस्थता
By Admin | Updated: June 29, 2014 00:38 IST2014-06-29T00:34:13+5:302014-06-29T00:38:23+5:30
प्रक्रियेचा वाद : मदनभाऊंच्या थेट घोषणेने नाराजी

उमेदवारीवरून सांगली कॉँग्रेसमध्ये अस्वस्थता
अविनाश कोळी ल्ल सांगली
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी आतापासूनच देव पाण्यात घातले असले, तरी मदन पाटील यांची उमेदवारी आधीच निश्चित करण्याच्या प्रकाराने त्यांची अस्वस्थता वाढली आहे. जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघात रितसर प्रक्रियेद्वारे उमेदवारी निश्चितीचा कार्यक्रम आखला जात असताना सांगलीसाठीच वेगळा न्याय का, असा सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे.
महापालिकेतील एका आढावा बैठकीत पालकमंत्री पतंगराव कदम व प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी सांगली विधानसभेसाठी मदनभाऊंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. इच्छुकांमधील एक शहर जिल्हाध्यक्ष मुन्ना कुरणे यांनी आढावा बैठकीच्या दुसऱ्यादिवशीच जाहीर प्रसिद्धीपत्रक काढून अशा थेट नाव निश्चितीला विरोध केला. कॉँग्रेसमध्ये उमेदवार निवडीची एक प्रक्रिया ठरलेली आहे. त्यानुसारच उमेदवार निवडला जाईल, असे स्पष्ट करून त्यांनी स्वत:लाही दिलासा दिला. वसंतदादा घराण्याविरोधात विरोधाचा सूर लोकसभा निवडणुकीपासूनच सुरू झाला आहे. प्रतीक पाटील यांच्याविरोधात सुभाष खोत, माजी आमदार हाफिज धत्तुरे, दिगंबर जाधव यांनी उघड टीका केली होती. धत्तुरेंच्या बंडखोरीने लोकसभा निवडणुकीत प्रतीक पाटील यांची डोकेदुखी वाढविली होती.
विधानसभा निवडणुकीत आता सांगली मतदारसंघात पुन्हा बंडखोरीचे संकेत मिळत आहेत. इच्छुकांची संख्या वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राजकीय हालचाली सध्या थंड असल्या तरी मदन पाटील यांना उमेदवारी देण्याच्या नेत्यांच्या वक्तव्याने अंतर्गत पक्षांतर्गत वातावरण तापले आहे.
कुरणे यांनी गेल्या अनेक वर्षात कॉँग्रेसच्या अशा थेट नाव निश्चितीवर आक्षेप नोंदविला नाही. यंदा मात्र त्यांनी या गोष्टीला थेट विरोध केला. कॉँग्रेसचेच दिगंबर जाधव गेली महिनाभर मदन पाटील व कॉँग्रेसच्या कारभारावर टीका करीत आहेत. पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अनेकांनी स्थानिक पातळीवरील कारभारावर नाराजी व्यक्त केली. प्रस्थापितांनाच उमेदवारी देण्याच्या पद्धतीवरही टीका करण्यात आली. पक्षाच्या बैठकीत झालेली गरमागरमी विधानसभा निवडणूक काळातही सुरू राहण्याची शक्यता आहे. कॉँग्रेसच्या बैठकांना केवळ पंचवीसभर कार्यकर्त्यांची हजेरी लागत असल्याने नाराजीची तीव्रता दिसून येत आहे. शहराध्यक्ष कुरणे यांनी महापालिकेच्या कारभारावर टीका केल्यामुळे नगरसेवकांनी त्यांनी बोलावलेल्या बैठकांना उपस्थित न राहण्याची भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे नाराजीची हीच परिस्थिती राहिली, तर विधानसभेच्या निवडणुकीत अनेक अडचणी कॉँग्रेससमोर निर्माण होणार आहेत.