शिराळ्यातील भाजपात अस्वस्थतेचे वातावरण
By Admin | Updated: July 10, 2016 01:42 IST2016-07-10T00:53:43+5:302016-07-10T01:42:15+5:30
कार्यकर्ते नाराज : दिग्गजांच्या घोषणा हवेत

शिराळ्यातील भाजपात अस्वस्थतेचे वातावरण
विकास शहा -- शिराळा शिवाजीराव नाईक मंत्री होणार, कॅबिनेट मंत्री होणार, त्यांचा योग्य सन्मान करू’, अशा अनेक घोषणा देणाऱ्या मंत्र्यांच्या घोषणा पोकळच राहिल्या. सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसला खिंडार पाडून भाजपने मोठे यश मिळविले. मात्र एकाही भाजप आमदाराला मंत्रिपद न मिळाल्याने भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: शिराळ्यात ती अस्वस्थता जास्त आहे.
शिराळा मतदारसंघाचे राजकीय वजन राज्य पातळीवर चांगले आहे. पहिल्यापासून या मतदारसंघातील लोकप्रतिनिधीस मानाचे स्थान मिळाले आहे. माजी विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख तसेच खुद्द शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपद मिळाले होते. विधान परिषदेसाठी आतापर्यंत शिवाजीराव देशमुख, शिक्षक नेते शिवाजीराव पाटील नि आता सदाभाऊ खोत यांच्या गळ्यात आमदारपदाची माळ पडली आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीवेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘शिवाजीराव नाईक यांना निवडून आणा. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देतो’, अशी घोषणा केली होती. यानंतर राम शिंदे, गिरीश महाजन, चंद्रकांतदादा पाटील या मंत्र्यांनीही विविध कार्यक्रमात शिवाजीरावांना मंत्रिपद देऊ, त्यांचा योग्य सन्मान करू, अशा घोषणा केल्या होत्या. तसेच मंत्रिमंडळ विस्तारावेळी सतत त्यांचे नाव मंत्रिपदासाठी अग्रस्थानी असायचे. अखेरच्या क्षणी त्यांना डावलले गेले. त्यामुळे शिवाजीराव नाईक गटातील कार्यकर्त्यांत नाराजी दिसत आहे. एक अभ्यासू ज्येष्ठ नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. भाजप पक्षास मात्र त्यांची अभ्यासू वृत्ती, पक्षवाढीची गरज, किंमत अजून समजली नाही. भाजपचे आ. सुरेश खाडे हे मंत्रिपदासाठी नाईक यांच्याबरोबर इच्छुक होते. या दोघांच्यातील मंत्रिपदाच्या रस्सीखेचमध्ये दोघेही मंत्रिपदापासून वंचित राहिल्याची चर्चा आहे.
सदाभाऊंची आंदोलने : मर्मभेदी भाषणे
शिराळा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आंदोलन, मर्मभेदी भाषणे, आंदोलनाची टोकाची भूमिका तसेच सहयोगी पक्षामुळे विधान परिषद आमदारकी तसेच मंत्रिपदही मिळाले. सामान्य कुटुंबातील व्यक्ती मंत्रिपदापर्यंत पोहोचली, हेही शिराळा राजकारणात पुन्हा एकदा सिद्ध झाले. या अगोदर शिवाजीराव देशमुख यांनी लोकवर्गणीतून निवडणूक लढून जिंकली होती. खोत यांच्या मंत्रिपदामुळे शेतकरी संघटनेत आनंदाचे वातावरण आहे.