बेकायदा खोदकामाला ऊत
By Admin | Updated: September 25, 2014 00:21 IST2014-09-24T23:42:37+5:302014-09-25T00:21:28+5:30
रस्ता उखडलेला : बेसुमार वृक्षतोडीने पर्यावरणाचा धोका

बेकायदा खोदकामाला ऊत
बिपीन पाटील -चरण -चांदोली राष्ट्रीय उद्यानात वृक्षतोड करणे, शांततेचा भंग करणे, खाणकाम करणे यासाठी बंदी असताना, उद्यानाच्या प्रवेशद्वाराकडे जाण्याच्या मुख्य मार्गावर संबंधित विभागाने जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात मुरुमासाठी खोदकाम केले आहे. याची चौकशी व्हावी, अशी मागणी निसर्गप्रेमींतून होत आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यानात प्रवेश करण्याअगोदर वन्यजीव विभाग कोल्हापूर यांनी जनाईवाडी येथे ‘चांदोली बुद्रुक’ म्हणून एक चेक पोस्ट नव्याने उभारलेले आहे. त्या ठिकाणी पर्यटकांची व वाहनांची तपासणी करुनच त्यांना पुढे सोडले जाते. विनापरवाना प्रवेश करणे, रात्रीच्या वेळी मुक्काम करणे, अवैध वृक्षतोड करणे, वनात आग लावणे अथवा वणवा पेटविणे, अवैध खाणकाम अथवा अतिक्रमण करणे, वन्यप्राण्यांना त्रास होईल अशाप्रकारे वाहनांचे हॉर्न वाजविणे, टेपरेकॉर्डर जोरात लावणे, दंगा करणे आदीबाबत कोणी या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांस शिक्षा व दंड केला जाईल, असा फलक कोल्हापूर वन्यजीव विभागाने लावला आहे. या नियमाचे उल्लंघन करुन संबंधित विभागाने मणदूर-खुंदलापूर या मुख्य रस्त्यावर जे. सी. बी.च्या सहाय्याने मुरुमाचे खोदकाम केले आहे. रस्त्याकडील मुरुमाचे खोदकाम केल्याने मुख्य रस्ता तुटू लागला आहे. याची मणदूर व खुंदलापूर मुख्य रस्त्याच्या उगवत्या बाजूची पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.
चांदोली धरण पॉर्इंटकडे जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. उद्यानातून पर्यटकांना चांदोली धरण पाहण्यासाठी शासनाने चांदोली धरण पॉर्इंट म्हणून जनाईवाडीजवळ लोखंडी अँगलमध्ये पॉर्इंटची उभारणी केली आहे. यामुळे पर्यटकांना चांदोली धरण व अभयारण्याची चांगल्या प्रकारची माहिती मिळत असते.
धरण पॉर्इंटकडे दुर्लक्ष
पॉर्इंटवर सतत पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र या पॉर्इंटकडे उद्यानातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. मुख्य रस्त्यावरून धरण पॉर्इंटपर्यंत डांबरीकरण रस्ता व पॉर्इंटची दुरुस्ती करावी, अशी पर्यटकांची मागणी आहे.
मणदूर गावापासून अंदाजे दहा कि.मी. अंतराजवळच चांदोली धरण पॉर्इंट आहे. मात्र या पॉर्इंटची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झालेली आहे. पॉर्इंटवरील पत्रा गायब झाला आहे. त्यामुळे पर्यटकांना ऊन-पावसाचा त्रास होत आहे. पॉर्इंटकडे जाणाऱ्या रस्त्याचीही दुरवस्था झालेली आहे. संबंधित विभागाने रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे मुरूमीकरण केलेले नाही.
बेकायदेशीर वृक्षतोडीकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे चांदोली उद्यानाला बकालपण येऊ लागले आहे.