उमदीत तलाठी आहे नावाला, उतारा मिळेना गावाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST2021-07-14T04:31:32+5:302021-07-14T04:31:32+5:30
उमदी : उमदी (ता. जत) येथे तलाठी कार्यालयात कोणत्याही प्रकारचे उतारे मिळत नसून, ‘तलाठी आहे नावाला उतारा मिळेना गावाला’ ...

उमदीत तलाठी आहे नावाला, उतारा मिळेना गावाला
उमदी : उमदी (ता. जत) येथे तलाठी कार्यालयात कोणत्याही प्रकारचे उतारे मिळत नसून, ‘तलाठी आहे नावाला उतारा मिळेना गावाला’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लवकरात लवकर उमदी येथील तलाठी कार्यालयात उतारे मिळण्याची सुविधा उपलब्ध करावी अन्यथा तलाठी कार्यालयाला ठाळे ठोकू, असा इशारा माजी उपसरपंच निसारभाई मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत दिला.
निसारभाई मुल्ला म्हणाले की, उमदी येथे सातबारा, खाते उतारा मिळण्यासाठी उमदी येथील सर्व नागरिकांनी मिळून लॅपटॉप, प्रिन्टर तसेच सर्व साहित्य आणण्यासाठी लोकवर्गणी गोळा केली होती. एवढेच नव्हे तर लोकवर्गणीतूनच तलाठी कार्यालयात टेबल, खुर्च्या देऊन कार्यालयाला रंगरंगोटी करून सुशोभिकरण केले. मात्र, याचा काडीमात्र फायदा उमदी येथील शेतकऱ्यांना झाला नाही. सातबारा, खाते उतारा काढण्यासाठी संख येथे जावे लागते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास होत आहे. त्वरित उमदी येथे सर्वप्रकारचे उतारे मिळण्याची सुविधा उपलब्ध करावी अन्यथा तलाठी कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा मुल्ला यांनी दिला.
यावेळी जगू आडवी, आप्पू न्हावी, मोदीन तांबोळी, शेट्याप्पा इम्मनवर आदी उपस्थित होते.