सांगलीत घरात घुसून मोबाईल चोरीचे प्रकार वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:09+5:302021-07-05T04:17:09+5:30
सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे लागू केलेलेे निर्बंध लक्षात घेता गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. तरीही या ...

सांगलीत घरात घुसून मोबाईल चोरीचे प्रकार वाढले
सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे लागू केलेलेे निर्बंध लक्षात घेता गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. तरीही या वर्षभरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये मात्र वाढ झाली आहे. शहरात दिवसाला एकतरी मोबाईल चोरीची फिर्याद नोंद आहे. सांगलीत घरात घुसून मोबाईल लांबविण्याचे प्रकार जास्त असून, चोरट्यांकडून या मोबाईलची शेजारच्या कर्नाटकात स्वस्त दरात विक्री होत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षांपासून गुन्हे घटले असले तरी सायबरविषयक गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातही मोबाईल चोरीचे प्रमाण खूपच वाढले आहे. गर्दीच्या ठिकाणी खिशात ठेवलेला मोबाईल अलगदपणे लांबवला जातो.
चौकट
६० टक्के मोबाईलचा शोध लागणे आव्हानच
चोरी झालेला मोबाईलच्या आयएमआय क्रमांकासह तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून लोकेशनच्या आधारे मोबाईलचा शोध घेतला जातो. मात्र, त्यासाठी मोबाईल चालूू राहणे आवश्यक असते. आता चोरटे एखादा मोबाईल चोरी केल्यानंतर किमान महिना ते काही महागडे मोबाईल सहा -सहा महिने सुरू करत नाहीत. त्यामुळे अशा मोबाईलचा शोध आव्हानच बनले आहे. यापूर्वी सायबर विभाग यात तत्काळ कार्यवाही करत होता. मात्र, आता वाढलेले चोरीचे प्रमाण व सायबरकडेही वाढलेल्या इतर तक्रारींमुळे मोबाईल शोधण्यात अडचणी येत आहेत.
चौकट
रेकॉर्डवरील मोबाईल चोरट्यांवर ‘वॉच’
चोरी, घरफोडीतील रेकॉर्डवरील गु्न्हेगारांकडून वारंवार गुन्हे घडत असतात. अगदी तसेच मोबाईल चोरीमध्येही काही ठराविक चोरटेच सक्रिय असतात. त्यामुळे पोलीसही मोबाईल चोरीचा तपास करताना या रेकॉर्डवरील आरोपींना ताब्यात घेऊनच तपास सुरु करतात. यात अनेकवेळा अल्पवयीनांकडून चोरी केली जात असल्याने कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाईला अडचणी येत आहेत.
चौकट
धूमस्टाईलनेही मोबाईलची चोरी
सांगलीत केवळ घरात घुसून, गर्दीतच मोबाईल चोरीचे प्रकार घडले नसून, अगदी रस्त्यावरुन मोबाईलवर बोलत चाललेल्या अथवा हातात असलेले मोबाईलही हिसडा मारुन लांबवले जात आहेत. सांगलीत सहा महिन्यांत असे प्रकार वाढले आहेत. दुचाकीवरुन पाठीमागून येऊन हिसडा मारुन मोबाईल घेऊन चोरटे धूमस्टाईलने पसार होत आहेत.
चौकट
परराज्यात विक्रीचे प्रमाण
शहरात चोरलेल्या माेबाईलची काही दिवसानंतर अत्यंत कमी किमतीत विक्री केली जाते. शेजारच्या कर्नाटकात असे सर्वाधिक मोबाईल विकले जातात.
चौकट
याठिकाणी सांभाळा मोबाईल
* हरभट रोड * मारुती रोड
* कापड पेठ * शनिवार बाजार
* विश्रामबाग चौक * मध्यवर्ती बसस्थानक
* रेल्वे स्थानक * गणपती पेठ
कोट
मोबाईल चोरीतील आरोपींना पकडून मोबाईल जप्त केले जात आहेत. जिल्ह्यात गस्तीवर असताना पथकाकडून मोबाईल चोरट्यांवर विशेष कारवाई केली जात आहे. चोरीचा मोबाईल विकत घेणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येते.
- सर्जेराव गायकवाड, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा