मिरजेत दुचाकी चोरणारी टोळी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:06 IST2020-12-05T05:06:31+5:302020-12-05T05:06:31+5:30
सांगली : शहरासह परिसरातून दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. मिरजेत चोरीची मोटारसायकल विकण्याच्या ...

मिरजेत दुचाकी चोरणारी टोळी अटकेत
सांगली : शहरासह परिसरातून दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. मिरजेत चोरीची मोटारसायकल विकण्याच्या तयारीत असतानाच सापळा रचून पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी रवी सुभाष जाधव (वय २६, रा. कुपवाड वेस, मिरज) व बाळू ऊर्फ संतोष शंकर शिंदे (रा. शंभरफुटी रोड, सांगली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून १ लाख ७० हजार रुपयांच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील जबरी चाेरी, घरफोडीसह अन्य गुन्ह्यांतील आरोपींकडून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी पथक तयार केले आहे.
गुरुवारी हे पथक माहिती घेत असताना, मिरजेतील पंचशील चौकात चोरीची मोपेड विकण्यासाठी दोघे येणार असल्याची बातमी मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. यावेळी चौकशी केली असता, मोपेड दोन महिन्यांपूर्वी मिरज मंगळवार बाजार येथून चोरल्याचे संशयितयांनी सांगितले. त्यांची अधिक चौकशी केली असता, दोघांनी मिरज, आष्टा, महूद (जि. सोलापूर), कोल्हापूर व हातकणंगले येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक अभिजित सावंत, सुधीर गोरे, शशिकांत जाधव, विकास भोसले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
चौकट
शिंदे रेकाॅर्डवरील
पथकाने अटक केलेला बाळू शिंदे हा संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यापूर्वी त्याच्यावर सांगली शहर, विश्रामबाग, मिरज येथे मोटारसायकल चाेरीचे गुन्हे दाखल आहेत.