दोन हजार एकर डाळिंब बागांवर बिब्ब्या
By Admin | Updated: September 3, 2015 23:46 IST2015-09-03T23:46:51+5:302015-09-03T23:46:51+5:30
जत तालुक्यातील स्थिती : वातावरणातील बदलाचा परिणाम, कृषी विभागाचे दुर्लक्ष

दोन हजार एकर डाळिंब बागांवर बिब्ब्या
गजानन पाटील--संख कृषी विभागाचे दुर्लक्ष, ढगाळ हवामान, कडक ऊन, वातावरणातील बदल, तुरळक पाऊस, माहितीचा अभाव यामुळे जत तालुक्यामध्ये डाळिंबावर बिब्ब्या रोगाचा (तेल्या डाग) सुमारे दोन हजार एकर क्षेत्रावर प्रादुर्भाव झाला आहे. या रोगाने शेतकऱ्यांच्या संपूर्ण बागाच गेल्या आहेत. कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होणार आहे. अगोदरच दुष्काळाने हैराण झालेल्या बागायतदारांवर बिब्ब्या रोगाचे नैसर्गिक संकट आल्याने बागायतदार देशोधडीला लागला आहे.
दरवर्षी फुलात असणाऱ्या व सुपारीच्या आकाराच्या फळांवर बिब्ब्याचे आक्रमण होत होते. मात्र यावर्षी मोठ्या फळांवरही बिब्ब्याने आक्रमण केल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. बँका, विकास सोसायट्या, सावकारांकडून काढलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न गावा-गावातून उभा आहे. यामुळे गावातील विकास सोसायट्या अडचणीत आल्या आहेत.
कायम दुष्काळी जत तालुक्यामध्ये डाळिंबाच्या मोठ्या प्रमाणात बागा आहेत. शेतकऱ्यांनी १०० टक्के फळबागा अनुदान योजना, एमआरजीसी, ठिबक सिंचनच्या साहाय्याने उजाड माळरानावर फुलविल्या आहेत. कमी खर्च, कमी कष्टामध्ये बागा येत असल्याने, शेतकऱ्यांनी द्राक्षबागा काढून डाळिंबाची लागण केली आहे. गणेश, भगवा, केशर या जातीच्या बागा आहेत. तालुक्यात डाळिंबाचे एकूण क्षेत्र ४ हजार २०० हेक्टर इतके आहे.
बिब्ब्या बॅक्टेरिया या विषाणूपासून हा रोग होतो. बिब्ब्या रोग पाने, फळांवर पडतो. गोलाकार पाणीदार डाग पडतो. काही तासातच तो गडद तपकिरी किंवा काळपट होतो. डागाच्या ठिकाणी उंचवटा तयार होऊन फळाला छिद्र पडते. ही सर्व प्रक्रिया अत्यंत कमी काळात घडते. संसर्गजन्य रोग असल्यामुळे संपूर्ण बाग चार-पाच दिवसात बळी पडते. टोळधाडीसारखे संकट असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर हताशपणे पाहत बसण्याशिवाय कोणताच पर्याय राहत नाही. बिब्ब्या पडलेली कित्येक टन डाळिंबे तोडून खड्ड्यात पुरून त्यांची विल्हेवाट लावली जात आहे.
सध्या दुपारपर्यंत कडक ऊन, दुपारनंतर ढगाळ हवामान, रिमझिम पाऊस, सकाळी दव, धुके असे वातावरणातील बदल, ही सर्व परिस्थिती बिब्ब्या रोगाला पोषक होत आहे. दरवर्षी बिब्ब्या फुलोऱ्यात असणाऱ्या बागांवर येत होता. यावर्षी पेरूचा आकार असलेल्या, परिपक्व बागांवरही बिब्ब्याने आक्रमण केले आहे. काही शेतकऱ्यांच्या संपूर्ण बागांवर हा रोग आला आहे. त्यांची संपूर्ण बागच वाया गेली आहे.
तालुक्यामध्ये बिब्ब्या रोगाचा प्रादुर्भाव होऊनसुद्धा कृषी विभागाने कोणत्याही प्लॉटला भेट दिलेली नाही. शेतकऱ्यांना रोगासंबंधीची, औषधाची योग्य माहिती न झाल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. दरीबडची येथे सुमारे १५० एकर क्षेत्रावर बिब्ब्याचा प्रादुर्भाव झाला आहे. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
स्ट्रेप्टोसायक्लीनचा घोळ
गेल्यावर्षी राहुरी व कृषी विद्यालय डिग्रज येथील पथकाने दरीबडची येथील बिब्ब्याग्रस्त बागांना भेट दिली होती. बिब्ब्या रोगाच्या नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन ०.९ टक्के औषधाची फवारणी करावी, असे सांगण्यात आले होते. परंतु तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांमध्ये स्ट्रेप्टोसायक्लीन ०.६ टक्के या घटकाचे औषध मिळते. स्ट्रेप्टोसायक्लीन ०.९ टक्के हे औषध मिळत नाही. सध्या तर स्ट्रेप्टोसायक्लीनऐवजी टैगमायसीन ९०.१० टक्के हे औषध मिळत आहे. त्यामध्ये स्ट्रेप्टोसायक्लीन सल्फेट + टे्रटॉसायक्लीन हायड्रोकार्बाईड हे घटक आहेत. परंतु हे बिब्ब्यावर गुणकारी व प्रभावी ठरत नाहीत.
विकास सोसायट्या अडचणीत
शेतकऱ्यांना बागांसाठी दरीबडची, सिद्धनाथ, सोरडी, दरीकोणूर, जालिहाळ खुर्द येथील विकास सोसायट्यांनी कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे. बागा बिब्ब्या रोगाने वाया गेल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची येणेबाकी असल्याने विकास सोसायट्या अडचणीत आल्या आहेत.
या उपायांची गरज...
बिब्ब्याग्रस्त फळे तोडून खड्डा काढून पुरावीत किंवा जाळावीत
सर्व शेतकऱ्यांनी एकाचवेळी फळधारणा करावी
सर्वांनी एकच औषध फवारावे
डाळिंबाच्या सामूहिक शेतीचा प्रयोग करावा
सेंद्रीय खताचा जास्त प्रमाणात वापर करावा
बिब्ब्यावर संशोधन करावे
बिब्ब्या रोगाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती केली आहे. रिमझिम पाऊस, त्यानंतर ऊन यामुळे बिब्ब्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तालुक्यामध्ये ८०० हेक्टर क्षेत्रावर बिब्ब्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. वरिष्ठांकडे अहवाल पाठविला आहे.
- बाळासाहेब लांडगे,
तालुका कृषी अधिकारी