शिक्षक दोन, पट शून्य!

By Admin | Updated: September 6, 2015 23:00 IST2015-09-06T23:00:20+5:302015-09-06T23:00:20+5:30

कागदावरच भरते शाळा : तासगाव तालुक्यातील ठोंबरे वस्तीवरील चित्र

Two teacher, zero zero! | शिक्षक दोन, पट शून्य!

शिक्षक दोन, पट शून्य!

दत्ता पाटील - तासगाव तासगाव तालुक्यातील शिरगावमधील गावापासून दोन किलोमीटर अंतरावर मोरे, ठोंबरे वस्ती आहे. या ठिकाणी जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची द्विशिक्षकी शाळा आहे. या ठिकाणी दोन शिक्षक असून पट मात्र शून्य आहे. मागील दोन वर्षे एकच पट होता. त्यामुळे ही शाळा केवळ कागदावरच भरवली जात आहे. तसेच महिन्याभरापासून इथले शिक्षक अन्य शाळांवर शिकविण्याचे काम करीत आहेत. मात्र त्यांचा पगार शासनाच्या नियमानुसार अद्यापही पट नसलेल्या शाळेवरच काढला जात आहे. शासनाच्या अजब नियमांचे असे इरसाल नमुने अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
राज्य शासनाकडून २० पटाच्या आतील शाळा बंद करण्याच्या निर्णयाबाबत अद्यापही निर्णयाचे गुऱ्हाळ सुरुच आहे. त्याबाबतची चर्चा सातत्याने होत असते. शिक्षण ही कायद्यात तरतूद असूनदेखील त्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. वीसच्या आत पट असणारी शिरगाव येथील मोरे-ठोंबरे वस्तीवरची शाळा आहे. आठ वर्षापूर्वी या ठिकाणी द्विशिक्षकी शाळा सुरु झाली. त्यावेळी वीसच्या वर पट होता. मात्र गेल्या चार वर्षात पटात सातत्याने घसरण होत राहिली. दोन वर्षापूर्वी ही गळती एका विद्यार्थ्यावर येऊन ठेपली. तरीही एका विद्यार्थ्यासाठी याठिकाणी दोन शिक्षक कार्यरत होते.
मागील महिन्यात या शाळेतील एकमेव विद्यार्थ्यानेही गावातील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतला. त्यामुळे ही शाळा चक्क शून्य पटाची झाली आहे. शासनाकडून शाळा बंद करण्याबाबत निर्णय झाला नसला तरी, मोरे-ठोंबरे वस्तीवरील द्विशिक्षकी शाळेला विद्यार्थ्यांअभावी टाळे लागले आहे. तासगाव पंचायत समितीतील सदस्यांच्या मागणीनंतर, अधिकाऱ्यांनी व्यावहारिक तोडगा काढून, दोन्ही शिक्षकांना तात्पुरत्या स्वरुपात रिक्त जागा असलेल्या नरसेवाडी आणि किन्नरवाडी गावातील शाळेत काम करण्यास सांगितले आहे.
शासन धोरणानुसार अद्यापही ठोंबरे वस्तीवरची शाळा कागदोपत्रीच भरवली जात असून पगारही याच शाळेतून काढला जात आहे.


ठोंबरे वस्ती शाळेत पट नसताना दोन शिक्षकांना आयता पगार दिला जात होता. मात्र तालुक्यातीलच धोंडेवाडी येथे पहिली ते चौथीपर्यंत ५५ पट असूनदेखील या ठिकाणी एकच शिक्षक, तर नरसेवाडीत पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळेत पाच शिक्षकांच्या पदांना मंजुरी असताना तीनच शिक्षक होते. त्यामुळे ठोंबरे वस्तीवरील दोन शिक्षकांची या दोन गावांतील शाळांत नेमणूक करण्याबाबत पंचायत समितीच्या सभेत मागणी केली होती. शासनाच्या धोरणानुसार अधिकृत बदली करता आली नाही. मात्र व्यावहारिक तोडगा काढून दोन्ही शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे.
- प्रभाकर पाटील, सदस्य, पंचायत समिती, तासगाव.

Web Title: Two teacher, zero zero!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.