जिल्ह्यात स्वाइनचे दोन बळी

By Admin | Updated: September 4, 2015 00:28 IST2015-09-04T00:28:31+5:302015-09-04T00:28:31+5:30

आणखी तीन रुग्ण दाखल : मृत महिला किर्लोस्करवाडीची, तरुण नाटोलीचा

Two swine suicides in the district | जिल्ह्यात स्वाइनचे दोन बळी

जिल्ह्यात स्वाइनचे दोन बळी

मिरज/सागाव : स्वाइन फ्लूने मिरजेतील वॉन्लेस रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या किर्लोस्करवाडी (ता. पलूस) येथील विवाहितेचा, तर कोल्हापुरात दाखल झालेल्या नाटोली (ता. शिराळा) येथील किरण दत्तात्रय पाटील (वय ३९) यांचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. स्वाइन फ्लूमुळे झालेल्या मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, रुग्णालयातील डॉक्टर व नर्सेसना स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस देण्यात आली. दरम्यान, इस्लामपूर येथील २० वर्षीय युवकास स्वाइन झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विट्यातील एका व अन्य दोन महिलांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.किर्लोस्करवाडी येथील विवाहितेस ताप, न्यूमोनिया व श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या लक्षणामुळे रविवारी वॉन्लेस रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. उपचार सुरू असताना बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लूच्या संशयामुळे त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल येईपर्यंत या विवाहितेचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लूमुळे महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काही डॉक्टर व नर्सेसना प्रतिबंधक लस देण्यात आली. महापालिका आरोग्याधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी महापालिका क्षेत्राबाहेर असलेल्या स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णाच्या मृत्यूबद्दल अद्याप माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. महापालिका क्षेत्रात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव नसल्याचा दावा त्यांनी केला.नाटोली (ता. शिराळा) येथील किरण पाटील यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. ते रत्नागिरी एसटी आगारात चालक होते. स्वाइन फ्लूची लागण झाल्याच्या संशयावरून त्यांच्यावर कोल्हापूर येथे सात ते आठ दिवसांपासून उपचार सुरू होते. आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीकडून नाटोलीत घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्वाइन फ्लू आजाराविषयी माहिती देणारी पत्रके वाटण्यात आली आहेत. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने पाटील यांच्या कुटुंबातील व संपर्कातील नातेवाइकांची तपासणी केली आहे. आरोग्य विभागाचे दोन कर्मचारी नाटोली गावामध्ये ठेवण्यात आले आहेत. (वार्ताहर)

महिलेला लागण
मिशन रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या विट्यातील
२८ वर्षीय गर्भवती महिला रुग्णाला स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्याने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, आणखी दोन महिला रुग्णालयात दाखल झाल्या आहेत.

Web Title: Two swine suicides in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.