बापाने नाकारलेल्या दोघी बहिणींनी रोवला सुरक्षा दलात झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:25 IST2021-02-07T04:25:07+5:302021-02-07T04:25:07+5:30
शिवाजी पाटील कोकरूड : मुली म्हणून बापाने लहानपणीच नाकारलेले. घरी शैक्षणिक वातावरण नाही आणि शिक्षण घेण्याची परिस्थितीही नाही. मात्र, ...

बापाने नाकारलेल्या दोघी बहिणींनी रोवला सुरक्षा दलात झेंडा
शिवाजी पाटील
कोकरूड : मुली म्हणून बापाने लहानपणीच नाकारलेले. घरी शैक्षणिक वातावरण नाही आणि शिक्षण घेण्याची परिस्थितीही नाही. मात्र, आईने चणे-फुटाणे विकत दोघींना जगण्याची, शिक्षणाची उमेद दिली... आणि आज त्यांची सीमा सुरक्षा दल व आसाम रायफल्स बटालियनमध्ये निवड झाली. लाडवाडी (येळापूर, ता. शिराळा) येथील पूजा आणि रोहिणी माने यांचे हे लखलखीत यश पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देणारे ठरले आहे.
पूजा आणि रोहिणी यांनी कोणत्याही खासगी ॲकॅडमीत न जाता स्वतःच्या बळावर पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. छाया माने यांना पूजा आणि रोहिणी या दोन मुली. दोन्ही मुली असल्याने छाया यांचे पतीसोबत वारंवार भांडण होत असे. रोजच्या भांडणाला कंटाळून त्यांनी दोन्ही मुलींसह स्वत:च्या मामाचे घर गाठले. मामावर बोजा नको म्हणून त्यांनी घरोघरी, बाजारात जाऊन चणे, फुटाणे, चिरमुरे विकले. मुली शाळेत चमक दाखवू लागल्या. पूजाला दहावीमध्ये ९३ टक्के, तर रोहिणीला ७२ टक्के गुण मिळाले. बारावीतही दोघींनी प्रथम श्रेणीत यश मिळवले. त्यानंतर त्यांनी सैन्यदलात जाण्याचा निश्चय केला.
परिस्थिती बेेताची असल्याने इच्छा असूनही छाया माने मुलींना खासगी शिकवणीला अथवा ॲकॅडमीमध्ये पाठवू शकत नव्हत्या. मात्र, त्यांनी दोघींना उमेद दिली. दोन्ही मुली दररोज सकाळ-संध्याकाळ गावाच्या बाहेर व्यायाम करत होत्या. वडिलांनी केलेला तिरस्कार विसरून आणि मुलगी म्हणजे परक्याचे धन म्हणून हिणवणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून, आईच्या कष्ट व जिद्दीच्या बळावर या दोन्ही बहिणींनी पहिल्याच प्रयत्नात सैन्य दलात झेंडा रोवला. पूजाची सीमा सुरक्षा दलात, तर रोहिणीची आसाम रायफल्समध्ये निवड झाली आहे. आईचे मामा-मामी, फौजी विष्णू गायकवाड, संतोष गायकवाड, सागर माने, सत्यजित गायकवाड, सागर गायकवाड यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले.
चाैकट
कमनशिबी बाप
लागोपाठ दोन मुली झाल्याने मुलींचा तिरस्कार करणाऱ्या वडिलांचे ४ ऑक्टोबर २०१४ रोजी निधन झाले. आपल्याला मुलगाच हवा, असे म्हणणारा हा पिता दोन्ही मुलींनी मिळवलेले यश पाहता न आल्याने कमनशिबी ठरला आहे.
फोटो-०६०२०२०२१पूजा माने, ०६०२०२०२१रोहिणी माने