मिरजेत लाच घेताना दोन पोलिसांना अटक
By Admin | Updated: February 15, 2015 00:49 IST2015-02-15T00:48:39+5:302015-02-15T00:49:00+5:30
शहरात खळबळ : तीन हजारांची रक्कम घेतली

मिरजेत लाच घेताना दोन पोलिसांना अटक
मिरज : मिरजेत तक्रार अर्जाची चौकशी व आरोपींवर कारवाईसाठी तीन हजारांची लाच घेणारा हवालदार मल्हारी आप्पा माने (वय ५४, रा. विश्रामबाग पोलीस चाळ, मूळ गाव जमखंडी, जि. विजापूर) व त्याचा साथीदार सागर बन्सीलाल शिरसाट (३०, रा. विश्रामबाग पोलीस वसाहत, मूळ गाव चोपडा, जि. जळगाव) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मिरज पोलीस ठाण्यातच रंगेहात पकडले. शनिवारी रात्री आठच्या दरम्यान ही कारवाई झाली. माने व शिरसाट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.
संतोष नंदकुमार गडकरी (रा. गणेशनगर, मिरज) यांचे गांधी चौकातील पोलीस चौकीजवळ खोक्यात पान दुकान आहे. गडकरी यांनी गणेश पिराजी माने यास खोके भाड्याने दिले होते. मात्र, सहा महिन्यांत दोघांत भाड्यावरून वाद निर्माण झाल्याने संतोष गडकरी यांनी खोके परत आपल्या ताब्यात घेतले. यामुळे चिडून गणेश माने दमदाटी, मारहाण व खोक्याला कुलूप घालणे, असे प्रकार करीत असल्याबद्दल गडकरी यांनी बुधवारी (दि. ११) शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. पोलीस हवालदार मल्हारी माने व त्याचा सहायक पोलीसनाईक सागर शिरसाट या दोघांनी अर्जाची चौकशी व आरोपींवर कारवाईसाठी १५ हजारांची मागणी केली. तीन हजारांत सौदा ठरवून गडकरी यांनी सांगली ‘लाचलुचपत’कडे तक्रार केली. त्यानुसार पोलीस निरीक्षक हरिदास जाधव, सुनील कदम, सुनील राऊत, सचिन कुंभार, अशोेक तुराई यांच्या पथकाने शनिवारी रात्री मिरज पोलीस ठाण्यात सापळा लावला. हवालदार मल्हारी माने याने तीन हजारांची लाच घेतली आणि त्यातील दीड हजार रुपये साथीदार सागर शिरसाट याला दिले. त्यावेळी त्यांना रंगेहात पकडले. (वार्ताहर)