‘स्वाइन’ने आणखी दोन महिलांचा मृत्यू
By Admin | Updated: October 2, 2015 23:44 IST2015-10-02T23:44:46+5:302015-10-02T23:44:46+5:30
फैलाव वाढला : मृत सांगली, मिरजेतील

‘स्वाइन’ने आणखी दोन महिलांचा मृत्यू
सांगली/संजयनगर : ‘स्वाइन फ्लू’ने आणखी दोन महिलांचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. रेश्मा नूर जमादार
(वय ४८, कोळी गल्ली, मिरज) व सुनीता बबन कोळपे (३२, संजयनगर, सांगली) अशी त्यांची नावे आहेत.
रेश्मा यांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती, तर सुनीता संशयित म्हणून दाखल होत्या, पण त्यांच्या रक्त तपासणीचा अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. रेश्मा जमादार यांना महिन्यापासून सर्दी, ताप व खोकल्याचा त्रास सुरू होता. खासगी रुग्णालयात औषधोपचार घेऊनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांना २६ सप्टेंबरला उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तपासणीचा अहवाल २९ सप्टेंबरला रुग्णालय प्रशासनास मिळाला होता. यामध्ये त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांना स्वाइन फ्लू कक्षात हलवून उपचार सुरू केले होते. मात्र, शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता त्यांचा मृत्यू झाला. सुनीता कोळपे यांनाही चार-पाच दिवसांपासून सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास सुरू होता. त्यांना मधुमेह होता. त्यांना हिवताप असल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितले होते. औषधोपचार करुनही त्यांचा ताप व खोकला कमी येत नव्हता. त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाली असावी, असा डॉक्टरांना संशय आला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यास सांगितले. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी त्यांना दाखल केले होते. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीला घेण्यात आले होते. अहवाल येण्यास दोन-तीन दिवस लागणार आहेत. मात्र तोपर्यंतच त्यांचाही शुक्रवारी पहाटे चार वाजता मृत्यू झाला.
दरम्यान, नव्याने चार संशयित दाखल झाले आहेत. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण सांगली, मिरज, कुपवाड व जत पसिरातील असल्याचे स्वाइन फ्लू कक्ष अधिकारी सदाशिव व्हण्णणावर यांनी सांगितले.
आरोग्य यंत्रणा कोमात
आठवड्यात महापालिका क्षेत्रात स्वाइन फ्लूने दहाजणांचा मृत्यू झाला आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. शेवटच्याक्षणी असे रुग्ण उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल होत आहेत. मात्र रक्त तपासणीचा अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू होत आहे. स्वाइनचा फैलाव वाढत असताना, आरोग्य यंत्रणा मात्र कोमात गेली असल्याचे चित्र आहे. त्यांच्याकडून जनजागृतीसाठी कोणतीही पावले उचलली जात नसल्याचे दिसून येते.