जत तालुक्यात आणखी दोन तलाव बांधणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:31 IST2021-09-12T04:31:23+5:302021-09-12T04:31:23+5:30
जत : वारणेचे पाणी जत तालुक्याला देण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळाला पत्र दिले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना मंजूर करण्यासाठी ...

जत तालुक्यात आणखी दोन तलाव बांधणार
जत : वारणेचे पाणी जत तालुक्याला देण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळाला पत्र दिले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना मंजूर करण्यासाठी एक-दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे हे पाणी तालुक्याला मिळणार, हे निश्चित झाले आहे. उलट तालुक्यातील पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी आणखी तलावांची गरज आहे. दोन मोठे साठवण तलाव मंजूर करण्याचेही माझे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
संख (ता. जत) येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. बसवराज पाटील, प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब, मोहन कुलकर्णी, रमेश बिराजदार, साहेबराव टोने, देयगोंडा बिराजदार, सुजाता पाटील, रणधीर कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. मंत्री जयंत पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.
जयंत पाटील म्हणाले की, जत तालुक्याच्या पाण्याच्या सोडवण्यासाठीच मी जलसंपदा खाते घेतले. या भागाचा दुष्काळ हटविण्यासाठी राजारामबापू पाटील यांनी उमदी ते सांगली पदयात्रा काढली होती. जत तालुक्यात आलो की पाणी द्या, अशी सर्वांचीच मागणी असायची. पाणी देण्याच्या अटीवरच बसवराज पाटील, प्रकाश जमदाडे व मन्सूर खतीब यांचा पक्षप्रवेश लांबला होता. उमदीत वारणेच्या पाण्याची घोषणा होताच या तिघांनी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला.
बसवराज पाटील म्हणाले की, राजारामबापू पाटील यांना मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न होते ते राहून गेले. आता त्यांच्याच घरातील मुलाला तरी मुख्यमंत्री बनविण्यासाठी जत तालुक्यातील जनतेने जयंत पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
मोहन कुलकर्णी, सुरेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अविनाश पाटील, बाळासो पाटील, रमेश पाटील, उत्तम चव्हाण, डॉ. गीता कोडग, सुश्मिता जाधव, मीनाक्षी अक्की, बाबासाहेब मुळीक आदी उपस्थित होते.
चाैकट
समस्या सोडविणार
जयंत पाटील म्हणाले की, वारणेच्या पाण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे, त्याचबरोबर पुराचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या भागातील समस्या सोडविण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात जिल्हा परिषद मतदारसंघानुसार बैठका लावणार आहे.