पणुंब्रेत दोन बिबट्यांचा मृत्यू
By Admin | Updated: December 25, 2016 23:55 IST2016-12-25T23:55:14+5:302016-12-25T23:55:14+5:30
विषबाधेचा संशय : विच्छेदन तपासणीस विलंब

पणुंब्रेत दोन बिबट्यांचा मृत्यू
वारणावती : पणुंब्रे वारूण (ता. शिराळा) येथील बोर्गेवाडीत रविवारी सकाळी दोन बिबटे मृतावस्थेत आढळून आले. अंदाजे तीन ते चार वर्षांच्या या दोन्ही बिबट्यांचा मृत्यू संशयास्पद दिसत असून, त्यापैकी एक नर व एक मादी आहे. दोन्ही बिबट्यांची लांबी तीन ते चार फूट आहे.
पणुंब्रे (ता. शिराळा) येथील बोर्गेवाडीच्या दरा परिसरात रविवारी सकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गस्त घालत असताना एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. अंदाजे तीन ते चार वर्षे वयाच्या या नर बिबट्याची लांबी तीन फूट ११ इंच, तर उंची ७९ सेंटिमीटर आहे. त्याच्या मृत्यूच्या कारणाबाबत संशय व्यक्त होत असतानाच त्याच परिसरात डोंगराच्या दुसऱ्या बाजूला आणखी एक बिबट्या मृत झाल्याची घटना उघडकीस आली.
वन विभागाकडून दुसऱ्या बिबट्याच्या मृत्यूची माहिती घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. सकाळी नऊ वाजता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. ही बातमी समजताच दरा परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
पंधरा दिवसांपूर्वी परिसरातील निवृत्ती बोर्गे यांची शेळी बिबट्याने ठार केली होती. येथील गुंडगेवाडी, सोनवडे, किनरेवाडी, खराळे परिसरात चरणाऱ्या जनावरांवर वारंवार बिबट्याने हल्ले केले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत वनअधिकारी तानाजी मुळीक यांच्या उपस्थितीत मृत बिबट्यांच्या पंचनामा व उत्तरीय तपासणीचे काम सुरूहोते. घटनास्थळी वनपाल ए. एन. एकसंबेकर, वन कर्मचारी शंकर नायकवडी, शिवाजी पाटील, लक्ष्मण झोले, विकास बोर्गे, वैभव गुरव उपस्थित होते.
मृत्यू कशामुळे?
या बिबट्यांचा मृत्यू निमोनिया, दमछाक किंवा विषबाधेमुळे झाला असावा, अशी चर्चा होती. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.