म्हैसाळ येथे दोन अपघातात दोघेजण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:29 IST2021-09-21T04:29:42+5:302021-09-21T04:29:42+5:30
म्हैसाळ येथे रविवारी दुपारी साडेतीन वाजता ट्रॅक्टरने धडक दिल्याने रस्त्याकडेला थांबलेले पायगोंडा रामगोंडा पाटील (वय ७८, रा. बंगला रोड, ...

म्हैसाळ येथे दोन अपघातात दोघेजण ठार
म्हैसाळ येथे रविवारी दुपारी साडेतीन वाजता ट्रॅक्टरने धडक दिल्याने रस्त्याकडेला थांबलेले पायगोंडा रामगोंडा पाटील (वय ७८, रा. बंगला रोड, म्हैसाळ) हे जागीच ठार झाले. रविवारी दुपारी पायगोंडा पाटील हे रस्त्याकडेला थांबले असताना के.ए. २३ - टी. व्ही. ५७९१ या ट्रॉलीसह भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅक्टरचा जोरदार धक्का त्यांना बसला. यामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने पलायन केले. याबाबत प्रकाश जुजारे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दुसऱ्या घटनेत म्हैसाळ-कागवाड रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने मालवाहतूक टेम्पोस धडक दिल्याने अक्षय मिराजी कांबळे (वय २२, रा. सुभाषनगर मिरज) हा दुचाकीस्वार तरुण ठार झाला. याबाबत टेम्पोचालक अरिफ सुलतान पठाण (४७, रा. गुरुवार पेठ, मिरज) यांनी दुचाकीचालक युवराज गायकवाड याच्याविरुद्ध पोलिसांत फिर्याद दिली आहे. म्हैसाळ - कागवाड रस्त्यावर शनिवारी रात्री साडेआठ वाजता युवराज शिवाजी गायकवाड, अक्षय मिराजी कांबळे व अन्य एका तरुणासह दुचाकीवरून ट्रीपल सीट भरधाव वेगाने येत होते. यावेळी गायकवाड याने चुकीच्या बाजूने दुचाकी चालवत टेम्पोस धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेला अक्षय कांबळे हा तरुण रस्त्यावर जोरात आपटून डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातात टेम्पोचेही नुकसान झाले. टेम्पोचालक अरिफ पठाण यांनी फिर्याद दिली असून, दुचाकी चालक युवराज गायकवाड याने निष्काळजीपणाने वाहन चालवून कांबळे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल मिरज ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.