आटपाडी : आटपाडी-भिवघाट रस्त्यावर भिंगेवाडी शिवारात सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगात असलेल्या चारचाकीने प्रथम दुचाकीला धडक दिल्यानंतर पुढे जाऊन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत घुसल्यामुळे हा गंभीर अपघात घडला.सुमारे साडेसातच्या सुमारास घडलेल्या या अपघाताने परिसर हादरला. अपघात इतका जबरदस्त होता की, चारचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे पुढील चाक निखळले.आटपाडी-भिवघाट रस्त्यावर सिद्धनाथ मंदिराजवळ फिरोज लतीफ सय्यद हे दुचाकीवर थांबलेले असताना, भिवघाटकडे वेगाने जाणाऱ्या चारचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. अपघातानंतर पकडले जाण्याच्या भीतीने चारचाकी चालकाने गाडी आणखी वेगाने पळवली.काही अंतरावर भिंगेवाडी शिवारात आटपाडीच्या दिशेने वीट वाहून आणणाऱ्या ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉलींमध्ये भरधाव चारचाकी (क्र. एमएच ११ एके ८७४५) घुसली. अपघात एवढा भीषण होता की, गाडीतील प्रवासी जागीच ठार झाले. या भीषण अपघातात वसंत उत्तम यादव (४३) व आर्यन मोहिते (१८, रा. कालेटेक, ता. कराड) यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.नागरिकांची सतर्कता : तातडीने मदत कार्य पुरवलेअपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले आणि त्यांना तपासणीसाठी आटपाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
Sangli: आटपाडीत भरधाव चारचाकीच्या भीषण अपघातात दोघे ठार, धडकून चारचाकी ट्रॉलीत घुसली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 12:22 IST