विठलापुरात दोन गटांत धुमश्चक्री
By Admin | Updated: July 26, 2015 00:16 IST2015-07-26T00:16:14+5:302015-07-26T00:16:31+5:30
पोलिसांचा लाठीहल्ला : दंगल नियंत्रण पथकासह पोलीस तैनात

विठलापुरात दोन गटांत धुमश्चक्री
आटपाडी : तालुक्यातील आठ गावांच्या ग्रामपंचायतींसाठी अत्यंत चुरशीने शनिवारी ८२.५९ टक्के एवढे मतदान झाले. विठलापूर येथील मतदान केंद्र क्रमांक एकसमोर शनिवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास दोन राजकीय गटांत पोलिसांसमोरच हाणामारी झाली. काहींनी दगडफेकही केली. पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला केला. याठिकाणी तणावपूर्ण स्थिती असून, दंगल नियंत्रण पथकासह सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
किरकोळ वादावादी आणि बाचाबाचीचे प्रकार वगळता सकाळपासून सर्वत्र शांततेत मतदान झाले होते. सकाळी मतदारांनी मतदान केंद्रासमोर रांगा लावल्या. दुपारी मतदारांची मतदान केंद्रासमोरील गर्दी कमी झाली. मात्र, सायंकाळी पुन्हा मतदार मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी केंद्रावर पोहोचले.
विठलापूर या संवेदनशील गावात यावेळी तिरंगी निवडणूक होत आहे. तिथे सायंकाळपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मात्र, सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास केंद्र क्रमांक १ समोर दोन गटांत मतदाराच्या ओळखीच्या पुराव्याच्या कारणावरून जोरदार मारामारी झाली. त्यावेळी काहींनी दगडफेक केली. तत्काळ पोलिसांची जादा कुमक तिथे पोहोचली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. मतदान केंद्राच्या परिसरातून सर्वांना पिटाळण्यात आले. याप्रकरणी हवालदार नामदेव गोडसे यांनी सिद्धेश्वर बाड, सोपान ऊर्फ बाळासाहेब बाड, जालिंदर पांडुरंग बाड आणि बापू संदीपान बाड या चौघांविरुद्ध भा. दं. स. कलम १६० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सध्या दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळी तहसीलदार जोगेंद्र कट्यारे आणि गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी भेट दिली. (वार्ताहर)
दुय्यम निबंधकांवर गुन्हा दाखल
आटपाडीचे दुय्यम निबंधक डी. एम. काळे यांची मतदान क्षेत्रीय अधिकारी म्हणून नेमणूक केली असताना, ते गैरहजर राहिले. आदेशाचा भंग करून कर्तव्यात कसूर केली म्हणून तहसील कार्यालयातील अव्वल कारकून उत्तम कांबळे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मालगावात वादावादी, लक्ष्मीवाडीत दगडफेक
मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे मनोज शिंदे व केदारराव शिंदे गटाच्या समर्थकांच्या बाचाबाचीनंतर पोलिसांनी मतदान केंद्रांच्या आवारातील जमावाला पांगविण्यासाठी लाठीहल्ला केला. तालुक्यातीलच मालगाव व कळंबीत मतदानप्रसंगी दोन गटांत वादावादी झाली. लक्ष्मीवाडी येथे शनिवारी दुपारी अज्ञातांनी ग्रामपंचायतीजवळ बंदोबस्तासाठी असलेल्या राज्य राखीव दलाच्या जवानांवर दगडफेक केली. राज्य राखीव दलाच्या जवानांनी जमावाला चोप देऊन पिटाळून लावले.