आरवडे येथे शेततळ्यात पडून दोन बालकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST2021-06-11T04:18:33+5:302021-06-11T04:18:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मांजर्डे : आरवडे (ता. तासगाव) येथील मस्के वस्तीवर घराजवळ शेततळ्यात पडून शौर्य संजय मस्के (वय ६, ...

आरवडे येथे शेततळ्यात पडून दोन बालकांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मांजर्डे : आरवडे (ता. तासगाव) येथील मस्के वस्तीवर घराजवळ शेततळ्यात पडून शौर्य संजय मस्के (वय ६, रा. आरवडे) व ऐश्वर्या आप्पासो आवटी (वय ८, रा. माधवनगर) या दोघांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.
आरवडे-गोटेवाडी रोडलगत असणाऱ्या मस्के वस्ती येथे आपल्या घराबाहेर शौर्य व ऐश्वर्या नेहमीप्रमाणे खेळत होती. सायंकाळच्या दरम्यान दोघेही दिसेनात म्हणून कुटुंबीयांनी आसपासच्या घरामध्ये शोधायला सुरुवात केली. मात्र, ते दोघे सापडले नाहीत.
त्यानंतर घरालगतच असणाऱ्या शेततळ्याकडे शोधायला गेले असता शेततळ्यात मोबाईल तरंगताना दिसला. यामुळे मुले पाण्यामध्ये घसरून पडल्याचा अंदाज व्यक्त करीत तरुणांनी पाण्यात उड्या टाकून शोधाशोध सुरू केली. काही वेळातच शेततळ्याच्या तळभागात दोघे सापडले. त्यांना तत्काळ पाण्याबाहेर काढून तासगाव येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ऐश्वर्या ही माधवनगर येथील नातेवाइकांच्या घरातून आरवडे येथे काही दिवसांपूर्वी आली होती. घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावणारा होता. शौर्य हा आई-वडिलांना एकुलता होता, तर ऐश्वर्या हिला दोन लहान भाऊ आहेत. आरोग्य विभागाचे डॉ. रोहित जाधव, गणेश करांडे व आरोग्यसेविका घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत थांबून होते.