ढालगावात दोन घरफोड्या, पाच लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:26 IST2021-05-09T04:26:57+5:302021-05-09T04:26:57+5:30
याबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, येथील संग्राम संजय ढोबळे घराला कुलूप लावून संग्राम व त्यांचे ...

ढालगावात दोन घरफोड्या, पाच लाखांचा ऐवज लंपास
याबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, येथील संग्राम संजय ढोबळे घराला कुलूप लावून संग्राम व त्यांचे आईवडील उकाडा जास्त असल्याने टेरेसवर झोपले होते. सकाळी उठल्यानंतर घराचा दरवाजा उघडा होता. कुलूप-कडी तोडली होती. घरातील दिवे, पंखे चालू होते. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे ढोबळे यांच्या लक्षात आले. घरातील डब्यात ठेवलेले बोरमाळ, गंठण, नेकलेस, अंगठी, सोनसाखळी असे साडेचार तोळे सोन्याचे दागिने व रोख सतरा हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले.
दुसरी चोरी सचिन प्रभाकर धोकटे यांच्या घरी झाली. धोकटे हे पुणे येथे कंपनीत नोकरीला आहेत. लाॅकडाऊन असल्याने ते गावी वडिलांकडे आले होते. येथूनच वर्क फ्राॅम होम काम करत होते. उकाडा असल्याने घराचा दरवाजा उघडा ठेवून दरवाजाला खुर्च्या लावून झोपले होते. नेमका याच संधीचा चोरट्यांनी फायदा घेऊन घरातील ऐवजावर डल्ला मारला. चार तोळ्याच्या पाटल्या, तीन तोळ्याचे गंठन असे तीन लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले आहेत.
चोरट्यांनी आणखी एका ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे त्यांच्या हाती काही लागले नाही. कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, पडळकर व सानप अधिक तपास करीत आहेत.