दुचाकीसह घरफोडीतील दोन सराईत चोरट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:26 IST2021-05-19T04:26:50+5:302021-05-19T04:26:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : खानापूर, आटपाडी, कडेगाव व सांगोला तालुक्यात दुचाकी चोरणाऱ्या व घरफोडी करणाऱ्या एका महिलेसह दोघांना ...

दुचाकीसह घरफोडीतील दोन सराईत चोरट्यांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : खानापूर, आटपाडी, कडेगाव व सांगोला तालुक्यात दुचाकी चोरणाऱ्या व घरफोडी करणाऱ्या एका महिलेसह दोघांना गजाआड करण्यात विटा पोलिसांना मंगळवारी यश आले. पोलिसांनी पाच दुचाकीसह एक लाख ८० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून या दोघांनी पोलिसांना दहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. अमोल विष्णू कांबळे (वय २७, रा. सुलतानगादे, ता. खानापूर) व लक्ष्मी सुभाष टोकले (वय ४५, रा. सांगोला, जि. सोलापूर) या दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे.
सुलतानगादे येथील संशयित अमोल कांबळे याच्याकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना मिळाल्यानंतर पोलीस पथकाने कांबळे याच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी त्याच्या घरी चोरीची दुचाकी सापडली. यावेळी पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन विटा पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली. यावेळी त्याने आणखी चार दुचाकी चोरल्याचे व दोन ठिकाणी घरफोडी केल्याचे पोलिसांना सांगितले. या चोरीत सांगोला येथील लक्ष्मी सुभाष टोकले ही त्याची सहकारी असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तिलाही अटक केली. त्यावेळी या दोघांनी विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेजेगाव येथे घरफोडी करून २५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आटपाडी हद्दीत एक घरफोडी आणि दुचाकी, कडेगाव हद्दीतून एक दुचाकी आणि सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गुन्हा केल्याची कबुली दिली. या दोघांकडून १० गुन्हे उघड करण्यात विटा पोलिसांना यश आले आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस प्रमुख मनिषा दुबुले, उपअधीक्षक अंकुश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली व पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल लोहार, राजेंद्र भिंगारदेवे, अमर सूर्यवंशी, सुरेश भोसले, शशिकांत माळी, रोहित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.