बँकेची १६ कोटींची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:22 IST2021-02-05T07:22:54+5:302021-02-05T07:22:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शेतकऱ्यांच्या कागदपत्रांच्या आधारे मिरज येथील बँक ऑफ बडोदा शाखेतून १६ कोटींचे कर्ज घेऊन बँकेची ...

Two arrested for defrauding bank of Rs 16 crore | बँकेची १६ कोटींची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

बँकेची १६ कोटींची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शेतकऱ्यांच्या कागदपत्रांच्या आधारे मिरज येथील बँक ऑफ बडोदा शाखेतून १६ कोटींचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक करणाऱ्या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. जितेंद्र शंकर दयाळ (रा. समतानगर, मिरज) व मुसा आयुब मोमीन (रा. सावर्डे, ता. हातकणंगले, सध्या रा. मिरज) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून त्यांना १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, मिरज येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत शेतकऱ्यांना आर्थिक आमिष दाखवून त्यांचे आधारकार्ड, सातबारा उताऱ्याच्या आधारे बँकेत कर्ज प्रकरण करण्यात आले होते. यात बँकेची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शाखाधिकारी डॉ. जगदीश नामदेवराव पाटील यांनी आठ जणांविरोधात मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

या गुन्ह्यातील संशयितांनी संगनमत करून शेतकऱ्यांच्या नावाने बेदाणा, हळद, मिरची या शेतमालाचे सीएनएक्स कमोडीटी नेक्स्ट या कंपनीचे झोनल हेड अजित जाधव यांच्याकडून बनावट चलन तयार करून ते चलन बँकेत सादर करून त्या मालावर तारण कर्ज काढून तो माल बँकेची परवानगी न घेता परस्पर विक्री करण्यात आला होता. बँकेचे थकीत कर्ज न भरता बँकेची १६ कोटी ९७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

यात दोघा संशयितांनी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांचा दुरुपयोग करून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांना अटक करण्यात आली.

अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजीवकुमार झाडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका शेळके यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

चौकट

गुन्ह्यातील मोठी रक्कम व गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. पथकाकडून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Two arrested for defrauding bank of Rs 16 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.