भिलवडी : औदुंबर (ता. पलूस) येथील मळीभागातील कमालपाशा बाबालाल कुलकर्णी यांच्या घरातून झालेल्या चोरीचा प्रकरणाचा भिलवडी पोलिसांनी छडा लावला. या प्रकरणी शाहरूख सलीम कुलकर्णी (वय २१) व असिफ बालेखान कुलकर्णी (३०) यांना भिलवडी पोलिसांनी अटक केली आहे.
कमालपाशा बाबालाल कुलकर्णी यांच्या घरी ७ जूनला चोरी झाली होती. त्यांच्या पँटच्या खिशातील पंधरा हजार रुपये तसेच बेडरूममधील पर्समधून चार तोळ्यांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्याने चोरले होते. भिलवडी पोलीस ठाण्यात याची नोंद झाली होती. पोलीस पथकाने आरोपींचा शोध घेत शाहरूख सलिम कुलकर्णी व असिफ बालेखाल कुलकर्णी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चाैकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
चोरीतील रोख दोन हजार रुपये व चोरीच्या रकमेतून खरेदी केलेल्या १३०० रुपयांचे साहित्य हस्तगत केले. आरोपींना पलूस येथील न्यायालयात हजर केले असता त्यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप, तानाजी देवकुळे, शिवाजी कोकाटे, पंकज मंडले, चंद्रकांत कोळी, मंगेश गुरव, विशाल पांगे यांनी कारवाई केली.