मांगलेत बिबट्याच्या हल्ल्यात दोन जनावरे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:49 IST2021-02-06T04:49:17+5:302021-02-06T04:49:17+5:30
मांगले : मांगले (ता. शिराळा) येथील बांबर डोंगर परिसरातील तानाजी आबा चरापले यांच्या शेतातील जनावरांच्या शेडमध्ये शिरून ...

मांगलेत बिबट्याच्या हल्ल्यात दोन जनावरे ठार
मांगले : मांगले (ता. शिराळा) येथील बांबर डोंगर परिसरातील तानाजी आबा चरापले यांच्या शेतातील जनावरांच्या शेडमध्ये शिरून बिबट्याने दोन जनावरांना ठार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
मांगले व परिसरातील लादेवाडी चिखलवाडी, फकीरवाडी, शिंगटेवाडी, इंग्रुळ, कांदे गावच्या परिसरात तीन वर्षांपासून बिबट्यांचा वावर आहे. शुक्रवारी सकाळी तानाजी चरापले नेहमीप्रमाणे जनावरांची धार काढण्यासाठी बांबर डोंगर परिसरातील वस्तीवर गेले. त्यावेळी त्यांना बिबट्याने शेडच्या भिंतीवर चढून आत प्रवेश करून एक वर्षाची कालवड व रेडीवर हल्ला करून ठार केल्याचे निर्दशनास आले. त्यांनी तात्काळ वन विभागास कळवले. त्यानंतर वनरक्षक शिवाजी देसाई व संभाजी पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. रीतसर पंचनामा केला.
मांगले परिसरात तीन वर्षांपासून बिबट्याचे पाळीव प्राण्यावर मोठ्या प्रमाणात हल्लासत्र सुरू आहे. दोन महिन्यापूर्वी शेवडेमळा परिसरात एका बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले होते. त्याप्रमाणे अन्य ठिकाणीही सापळा लावून या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.