मिरज कोविड प्रयोगशाळेत दररोज अडीच हजार नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:26 IST2021-04-25T04:26:46+5:302021-04-25T04:26:46+5:30

मिरज सिव्हिलमध्ये जैविक प्रयोगशाळेत संशयित कोरोना रुग्णांच्या स्रावाच्या नमुन्याची तपासणी करण्यात येते. गतवर्षी १ एप्रिलपासून मिरजेत प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर ...

Two and a half thousand samples per day in Miraj Kovid Laboratory | मिरज कोविड प्रयोगशाळेत दररोज अडीच हजार नमुने

मिरज कोविड प्रयोगशाळेत दररोज अडीच हजार नमुने

मिरज सिव्हिलमध्ये जैविक प्रयोगशाळेत संशयित कोरोना रुग्णांच्या स्रावाच्या नमुन्याची तपासणी करण्यात येते. गतवर्षी १ एप्रिलपासून मिरजेत प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर जूनपासून जिल्ह्यातील रुग्णांची व संशयितांची संख्या वाढत गेल्याने दररोज हजार नमुन्यांची तपासणी करण्यात येत होती. वर्षभरात जिल्ह्यातील सुमारे दोन लाख नमुने तपासण्यात आले आहेत. मात्र प्रयोगशाळा सुरू झाल्यापासून यावर्षी एप्रिल महिन्यातच नमुन्यांच्या संख्येत वाढ हाेत असून, एप्रिलमध्ये सुमारे ५० हजार नमुन्यांची तपासणी झाली आहे.

प्रयोगशाळेत पॅथाॅलाॅजी व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थी व जिल्हा परिषद आरोग्य सहायकांची मदत घेण्यात येत आहे. प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांनाही कोरोना संसर्गाचा सामना करावा लागला आहे. डिसेंबरपासून जिल्ह्यात रुग्णसंख्येत घट झाल्याने ताण कमी झाला होता. जानेवारीपर्यंत दररोज दोनशे नमुने तपासणीसाठी येत होते. मात्र मार्चअखेर नमुन्यांच्या संख्येत मोठी वाढ होऊन एप्रिलमध्ये दररोज अडीच हजारांच्या पुढे तपासण्यात हाेत असल्याने कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. दैनंदिन तपासणी संख्या वाढत असल्याने प्रयोगशाळेतील १५ कर्मचाऱ्यांच्या मदतीला रुग्णालयाच्या अन्य विभागांतील तंत्रज्ञ व कंत्राटी कर्मचाऱ्यांना नेमण्यात आले आहे. प्रयोगशाळेत २४ तास काम सुरू असताना रियल टाइम पीसीआर ही दोनच उपकरणे असल्याने तपासणीची गती संथ आहे. यामुळे दोन दिवसांनी अहवाल मिळत आहे.

मिरज सिव्हिलमध्ये जिल्ह्यातील एकमेव शासकीय कोविड प्रयोगशाळा असून, खासगी वैद्यकीय महाविद्यालयातही प्रयोगशाळा सुरू झाल्यास ताण कमी होणार आहे.

चाैकट

पाॅझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण ३० टक्क्यांवर

सध्या येणाऱ्या नमुन्यांत पाॅझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण तब्बल ३० टक्क्यांवर पोहोचले आहे. गतवर्षी एप्रिलपासून यावर्षी जानेवारीपर्यंत हे प्रमाण केवळ १० टक्के होते. रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यास त्याची दोनवेळा तपासणी होत असल्यानेही अहवाल मिळण्यास विलंब होत आहे.

Web Title: Two and a half thousand samples per day in Miraj Kovid Laboratory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.