वांगीत दोन एकर ऊस जळाला
By Admin | Updated: November 12, 2014 22:56 IST2014-11-12T21:52:21+5:302014-11-12T22:56:21+5:30
शॉर्टसर्किटमुळे आग : शेतकऱ्यांचे अडीच लाखाचे नुकसान

वांगीत दोन एकर ऊस जळाला
वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे शॉर्टसर्किटने दोन एकर ऊस जळाला. आगीत दोन लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. वांगी येथील आरफळ कालव्याजवळ येरळा नदीकाठावर शंकरराव माधवराव पाटील व हणमंत रामचंद्र मोहिते यांचा ऊस आहे. शंकरराव पाटील यांच्या उसात विजेचे खांब आहेत. विद्युत पंपांना वीज पुरवठा करणाऱ्या वीजवाहक तारा याठिकाणी लोंबकळत असल्याने आज दुपारी एकच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन शंकरराव पाटील यांच्या उसाने पेट घेतला. तसेच जवळच असणाऱ्या हणमंत मोहिते यांच्या उसानेही पेट घेतला. उसाने पेट घेतल्याचे अर्जुन मोहिते यांनी पाहिले. याची माहिती त्यांनी ऊस मालकांना दूरध्वनीवरून दिली. राजेंद्र पाटील यांनी सोनहिरा कारखान्याच्या अग्निशमन गाडीला बोलावून आग विझविण्यात आली. शंकरराव पाटील यांच्या दोन एकरापैकी एक एकर ऊस जळाला, तर हणमंत मोहिते यांचा एक एकर ऊस जळाल्याने अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. येरळा नदीकाठावर मोठ्या प्रमाणात ऊसक्षेत्र आहे. सोनहिरा कारखान्याच्या अग्निशमन गाडीने आग आटोक्यात आणल्यामुळे शेकडो एकर ऊस आगीपासून वाचला आहे. (वार्ताहर)
महावितरणच्या प्रशासनाचे दुर्लक्ष
वीजवाहक तारा बऱ्याच ठिकाणी लोंबकळत आहेत. मोठमोठ्या झाडांच्या फांद्यांमधून तारा गेल्यामुळे अनेकवेळा शॉर्टसर्किट होत आहे. लोंबकळत असणाऱ्या तारा व्यवस्थित करून घ्याव्यात, तसेच झाडांच्या फांद्या तोडून तारा रिकाम्या कराव्यात, अशी मागणी करूनही वीज कंपनी याकडे दुर्लक्ष करीत आहे.