बावीस टक्के अंध ‘दृष्टी’ दुर्लक्षामुळे-- अंधदिन विशेष

By Admin | Updated: October 14, 2014 23:21 IST2014-10-14T22:43:17+5:302014-10-14T23:21:53+5:30

डॉक्टरांचा इशारा : काळजी घेण्यास टाळाटाळ--जागतिक

Twenty-two percent of the blind 'vision' ignores - blindness special | बावीस टक्के अंध ‘दृष्टी’ दुर्लक्षामुळे-- अंधदिन विशेष

बावीस टक्के अंध ‘दृष्टी’ दुर्लक्षामुळे-- अंधदिन विशेष

नरेंद्र रानडे - सांगली जिल्ह्यातील एकूण अंधांपैकी सुमारे २२ टक्के जणांचे अंधत्व केवळ डोळ्यांची काळजी घेण्यास टाळाटाळ केल्याने आले असल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे व्यसनाच्या आहारी गेलेल्या युवा पिढीचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्रतज्ज्ञ डॉ. अभिजित ढवळे यांनी याबाबतचे सर्वेक्षण केले आहे. त्यातून महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. पाश्चात्यांच्या अंधानुकरणामुळे अनेकांचे जीवनमान बदलत चालले आहे. साहजिकच अनेकांच्या खाण्यात फास्ट फूडचा भरणा आहे. परंतु त्यामुळे शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वे मिळतात का, याकडे मात्र अनेकजण सोयीस्कररित्या दुर्लक्षच करतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वाचा पुरवठा होणे आवश्यक असते. प्रामुख्याने हिरव्या पालेभाज्या, फळे, शेवगा, आवळा, मांसाहारींसाठी यकृत आदींमधून आवश्यक जीवनसत्त्वाचा पुरवठा होतो. याची कमतरता जाणवल्यास रातांधळेपणा येण्याचा धोका असतो.
बऱ्याच कालावधीपासून मधुमेह असणाऱ्या व्यक्तीच्या रक्तवाहिन्या अधू होतात. रक्तवाहिन्यांतील दोषांमुळे नेत्रपटलांमध्ये बदल होऊन त्यामध्ये दोष उत्पन्न होतो व दृष्टी अधू होण्यास प्रारंभ होतो. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी नियमित व्यायाम करुन साखर नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. हा आजार नियंत्रणात ठेवण्यात अपयश आल्याने संबंधितांना दृष्टिविकारांचा धोका संभवतो. व्यसनांच्या वाढत्या प्रमाणामुळे स्त्रियांपेक्षा पुरुषांना अंधत्वाचा धोका अधिक असल्याचेही निदर्शनास आले आहे. व्यस्त जीवनशैलीतून थोडा वेळ डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वेळ काढून वर्षातून किमान एक वेळ तरी डोळ्यांची तपासणी केल्यास, अंधत्वापासून लांब राहता येते. अंधांची नेमकी आकडेवारी उपलब्ध नसली तरीही, अंधत्वामध्ये वाढ होताना दिसत आहे. तसेच मोतिबिंदू, काचबिंदू आदींवर वेळीच उपचार न केल्याने काहींची वाटचाल अंधत्वाच्या दिशेने सुरू आहे.

नात्यात विवाह धोकादायक
विवाह करताना शक्यतो नात्यामध्ये करु नये. त्यामुळे अंधत्वाची पहिली पायरी असणारे दष्टिदोष होण्याची शक्यता ६० टक्के असते. ज्या व्यक्तींना प्रथमपासूनच दृष्टिदोष आहे, त्यांनी नात्यात लग्न केल्यास, त्यांना होणाऱ्या अपत्यासही दृष्टिदोष होण्याचा संभव असतो.

डोळस व्यक्तींना अंधत्व कधी येऊ शकते?
नेत्रपटल म्हणजे असंख्य पेशींचा पडदा असतो. याच्या माध्यमातून प्रकाश, रंग आदी संवेदना या पेशीमार्फत मेंदूकडे पोहोचविल्या जातात. अतिरक्तदाब, मधुमेह व व्यसनाधिनता यामुळे नेत्रपटल बिघडते आणि दृष्टी अधू होत जाते. यावर वेळीच उपचार केले नाहीत.

जिल्ह्यात अंधांची एकमेव शाळा
कित्येकजण जन्मत:च जग पाहण्यास पारखे होतात. अशा चिमुकल्यांसाठी मिरज येथे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड या संस्थेची जिल्ह्यातील एकमेव अंधशाळा आहे. त्यामध्ये ६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

तंबाखूजन्य पदार्थ आणि दारूचे नियमित सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीवर विपरित परिणाम होऊ लागतो. हा परिणाम सावकाश होत असल्याने त्याचे गांभीर्य आपल्या लक्षात येत नाही. परंतु कालांतराने दृष्टी जाण्याचा संभव असतो. त्यामुळे युवकांनी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे.
- डॉ. अभिजित ढवळे,
साहाय्यक प्राध्यापक, नेत्र विभाग

Web Title: Twenty-two percent of the blind 'vision' ignores - blindness special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.