बेवनूरमध्ये बावीस दिवसांतून पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2016 23:38 IST2016-05-20T23:23:04+5:302016-05-20T23:38:59+5:30
परिसरात तीव्र टंचाई : गावे, वाड्या-वस्त्यांवर ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

बेवनूरमध्ये बावीस दिवसांतून पाणी
शेगाव : बेवनूर (ता. जत) येथे टँकरच्या खेपा होत नसल्यामुळे गावामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. आजुबाजूच्या गावांसह वाड्या-वस्त्यांवर व गावात २२ दिवसांतून एकदा पाणी मिळत आहे. अधिग्रहण केलेल्या विहिरीचे अंतर व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावापासून सहा किलोमीटरवर असलेल्या गुळवंची तलावात पाणी आले आहे. तेथूनच पेयजल योजनेतून नळपाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या दीड वर्षापासून रखडले आहे.
जतच्या उत्तरेला सांगोला, कवठेमहांकाह तालुक्याच्या सीमेला असलेल्या बेवनूर गावाची लोकसंख्या तीन हजार आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी जुनी विहीर कोरडी पडल्याने सहा महिन्यांपासून टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. सुरुवातीला दोन टँकरच्या खेपा मंजूर होत्या. पाणी कमी पडू लागले म्हणून ग्रामस्थांच्या मागणीनुसार तीन खेपा मंजूर आहेत. पाण्यासाठी गुळवंची येथे खासगी विहीर अधिग्रहण करण्यात आली.
गावापासून जास्त अंतर, यानियमित वीजपुरवठा, भारनियमन यामुळे दिवसभरातील खेपा पूर्ण होत नाहीत. फक्त एक-दोन खेपा होत आहेत. गावाखालील ११ वाड्या-वस्त्या व गावाला पाणीपुरवठा कमी होत आहे मात्र दुसऱ्या बाजूला अधिग्रहण केलेल्या विहिरीतील पाणी अगोदरच दुसऱ्याला विकले जाते. त्यामुळे टँकर लवकर भरला जात नाही. त्यामुळे दिवसभरातील खेपा पूर्ण होत नाहीत. तसेच कागदोपत्री टॅँकरच्या खेपा दाखविल्या जात आहेत. पाणी असून सुद्धा गावातील विहीर अधिग्रहण केली नाही, असा आरोप ग्र्रामस्थांतून केला जात आहे.
गुळवंची येथील विहीर अधिग्रहण केली आहे. गावापासून अंतर जास्त आहे. अनियमित वीजपुरवठा व भारनियमन यामुळे दिवसभरात तीन खेपाही पूर्ण होत नाहीत. २०-२२ दिवसांतून पाणी पुरवठा होत आहे. शिंदे वस्ती, शेख, सरगर, लिंबाचा मळा, टेकड मलमे या वाड्या-वस्त्यांवर अपुरा पाणी पुरवठा होत आहे. (वार्ताहर)