मिरजेत छत्रपती शिवाजी रस्त्यासाठी साडेसत्तावीस कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST2021-05-09T04:27:28+5:302021-05-09T04:27:28+5:30
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत १०० कोटी खर्च करण्यात येणार असल्याची तीन वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. ...

मिरजेत छत्रपती शिवाजी रस्त्यासाठी साडेसत्तावीस कोटी
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत १०० कोटी खर्च करण्यात येणार असल्याची तीन वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. मात्र निधीची तरतूद केली नसल्याने या रस्त्याचे काम रखडले होते. रस्त्यासाठी आमदार सुरेश खाडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला. मिरज शहर सुधार समितीनेही यासाठी आक्रमक पवित्रा घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिनी, दि. २७ मे रोजी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला हाेता. आमदार सुरेश खाडे यांनीही रस्त्यासाठी समितीच्या आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्यासाठी ५९ कोटी खर्चाचा नवीन प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या १० किलाेमीटर रस्त्यासाठी २७ कोटींचा निधी मंजूर केल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच रस्त्याची निविदा काढण्यात येणार आहे. निधी मंजूर झाल्याने आता या रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे मिरज सुधार समितीचे ॲड. ए. ए. काझी यांनी सांगितले.
चाैकट
मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज हा प्रमुख रस्ता आता शहरातून चार पदरी व ग्रामीण भागात दोन पदरी होईल. रस्त्याच्या मध्ये स्ट्रीट लाइट व दोन्ही बाजूला फुटपाथ होणार असल्याचे आमदार सुरेश खाडे यांनी सांगितले. जूनअखेरीस या रस्त्याच्या कामास सुरुवात होणार आहे. खाडे म्हणाले, रस्त्यासाठी यापूर्वी १०० कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग शहरालगत जात असल्याने ऐनवेळी निधी नामंजूर करण्यात आल्याने या रस्त्याचे काम रखडले होते.