बारावेळा अपयश पचवून आटपाडीतील चहावाला झाला सीए
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:28 IST2021-09-18T04:28:18+5:302021-09-18T04:28:18+5:30
लक्ष्मण सरगर लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : अपयशाला खचून न जाता जिद्दीच्या जोरावर यशाला गवसणी घालता येते, याची प्रचिती ...

बारावेळा अपयश पचवून आटपाडीतील चहावाला झाला सीए
लक्ष्मण सरगर
लोकमत न्यूज नेटवर्क
आटपाडी : अपयशाला खचून न जाता जिद्दीच्या जोरावर यशाला गवसणी घालता येते, याची प्रचिती येथील संतोष नामदेव बालटे या जिगरबाज तरुणाने दिली आहे. सलग बारा वेळा अपयश मिळूनही न डगमगता या चहा विकणाऱ्या तरुणाने सनदी लेखापाल (चार्टर्ड अकौंटंट) परीक्षा उत्तीर्ण होत आदर्श निर्माण केला आहे.
आटपाडीत महावितरण कार्यालयासमोर संतोषचे वडील नामदेव बालटे यांचे चहाचे दुकान आहे. नामदेव दुसरा मुलगा दीपकसोबत हा व्यवसाय सांभाळतात. संतोषचे मोठे भाऊ उत्तम बालटे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. अत्यंत साधी राहणी व प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या वडिलांनी कष्टाने मुलांना वाढवले आहे. वडिलांना मदत करत-करत सीए होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या संतोषने सहा वर्षात बारावेळा सीएच्या परीक्षा दिल्या. बारा वेळा यशाने त्याला हुलकावणी दिली. अखेरच्या प्रयत्नात मात्र संतोषने यशाला गवसणी घालत सीए होण्याचे स्वप्न साकारलेच, शिवाय आईवडिलांच्या कष्टाचे पांग फेडले.
कष्ट करण्याची तयारी हा त्याचा अंगभूत गुण. शाळेत हुशार असणारा संतोष चहाचे कप धुताना आयुष्याची स्वप्ने बघत होता. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आजोळी नाझरे (ता. सांगोला) येथे झाले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण आटपाडीत झाले. येथे वडिलांना व्यवसायात मदत करत बारावीचे शिक्षण पूर्ण केले. २००९ मध्ये सीएची परीक्षा देण्याचा निश्चय करत त्याने पुणे गाठले. तेथे पदवीचे शिक्षण घेत असताना अनेक चार्टर्ड अकाऊंटंटकडे काम करत अनुभव घेतला. २०१४ व २०१७ मध्ये पायाभूत परीक्षा तो उत्तीर्ण झाला; मात्र मुख्य परीक्षा त्याला हुलकावणी देत होती. अखेर २०२१ मध्ये तो सीए झाला.
कोट
सुरुवातीला वेजेगाव (ता. खानपूर) येथे लोकांच्या शेतात चाकरी करून मुलांना शिक्षणासाठी खर्च करत होतो. नंतर आटपाडी येथे १९९७ मध्ये चहाची टपरी सुरू केली. मुलांच्या शिक्षणासाठी फार खर्च आला. परंतु लोकांच्या आशीर्वादामुळे संतोषने यश मिळवले. सीए म्हणजे काय असते, हे मला कळत नाही, परंतु त्याने जिद्दीने त्याचे स्वप्न पूर्ण केले, याचा अभिमान वाटतो.
- नामदेव बालटे