सांगली मार्केट यार्डात दहा कोटीची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:26 IST2021-05-08T04:26:52+5:302021-05-08T04:26:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कडक लॉकडाऊनमुळे सांगलीतील वसंतदादा पाटील मार्केट यार्ड आणि विष्णू अण्णा पाटील फळ मार्केटमधील व्यवहार ...

सांगली मार्केट यार्डात दहा कोटीची उलाढाल ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कडक लॉकडाऊनमुळे सांगलीतील वसंतदादा पाटील मार्केट यार्ड आणि विष्णू अण्णा पाटील फळ मार्केटमधील व्यवहार कडकडीत बंद आहेत. बंदमुळे सुमारे दहा कोटींची उलाढाल ठप्प झाली. भाजीपाला, फळ उत्पादक शेतकऱ्यांना मात्र लाखोंचा फटका बसला आहे.
जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडून वाढती रूग्णसंख्या कमी व्हावी यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनी आठ दिवसाचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. याची गुरुवारपासून अंमलबजावणी केली जात आहे. येथील सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने मार्केट यार्ड व फळ मार्केटमधील सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. गूळ, मिरची या मालासह सर्व सौदे बंद आहेत. धान्याची दुकानेही बंद होती. याशिवाय फळ मार्केटमधील कांदा, बटाटा, लसूण, यासह फळांचे सौदेही बंद ठेवले होते. लॉकडाऊनमुळे सांगली मार्केट यार्ड आणि विष्णू अण्णा फळ मार्केट येथील दहा कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. उलाढाल बंद असल्याने बाजार समितीलाही चार लाखाचा फटका बसला.
मार्केट यार्ड आणि फळ मार्केट बंद असल्याने गाडीवान, हमाल, तोलाईदार, महिला कामगारांनाही काम मिळाले नाही. १३ मे पर्यंत मार्केट यार्डातील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनला बाजार समिती प्रशासनाने चांगला प्रतिसाद दिला. विनाकारण यार्डामध्ये कोणी येऊ नये, यासाठी रेल्वे स्टेशनकडे जाणारे प्रवेशद्वारही बंद केली आहेत.