शिक्षक बँक अध्यक्ष पदासाठी ‘तुकाराम-हरी’चा जयघोष
By Admin | Updated: April 30, 2015 00:23 IST2015-04-29T23:38:35+5:302015-04-30T00:23:57+5:30
नेत्यांचे संकेत : मिरज तालुक्याला संधीची शक्यता

शिक्षक बँक अध्यक्ष पदासाठी ‘तुकाराम-हरी’चा जयघोष
प्रवीण जगताप -लिंगनूर --सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅँकेच्या निवडणुकीत शिक्षक समितीने तेरा संचालकांच्या जोरावर सत्ता मिळवली आहे. आता बॅँकेच्या अध्यक्ष पदाची चर्चा सुरू झाली आहे. मिरजेने दिलेले मताधिक्य, कार्यकर्त्यांचे जाळे, समितीचा बालेकिल्ला, कार्यकर्त्यांची मागणी आणि मागील पाच वर्षात अध्यक्ष पदाची न मिळालेली संधी, यामुळे मिरज तालुक्यालाच अध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. आरग येथील हरीबा गावडे आणि तुकाराम गायकवाड अध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. नेत्यांनीही विजयानंतरच्या बैठकीत तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे अध्यक्ष पदासाठी ‘तुकाराम-हरी’चा जयघोष सुरू झाला आहे.
यंदा प्रथमच शिक्षक बॅँकेसाठी नव्या सहकारी कायद्यानुसार मतदान झाले होते. त्यामुळे मिरज, जत व वाळवा या अधिक सभासद असणाऱ्या दोन तालुक्यांना महत्त्व प्राप्त झाले. मिरज तालुक्यात समितीच्या उमेदवारांना जादा मताधिक्य मिळाले. त्याचा फायदा जिल्ह्यातील अन्य उमेदवारांना झाला. मिरज तालुक्यातील नेत्यांनी बालेकिल्ला मजबूत असल्याचेच सिद्ध केले. त्यात राज्य कोषाध्यक्ष किरण गायकवाड, हरीबा गावडे, तुकाराम गायकवाड, श्रेणिक चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले.
समितीच्या स्थापनेपासून मिरज तालुक्यात समितीचेच वर्चस्व राहिले आहे, तर बॅँकेच्या विजयानंतर झालेल्या बैठकीतही मिरज तालुक्याला संधी देण्याबाबत विचार करू, असे संकेत समितीचे नेते विश्वनाथ मिरजकर यांनी दिले आहेत. पार्लमेंटरी बोर्ड, समितीचे नेते आता कोणत्या तालुक्याला संधी देणार, याकडे मिरज तालुक्यातील व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.
तुकाराम-हरीची जोडगोळी आभारातही पुढे
अध्यक्ष पदासाठी हरीबा गावडे आणि तुकाराम गायकवाड प्रबळ दावेदार आहेत. गावडे २४ वर्षांपासूनचे समितीचे कट्टर कार्यकर्ते असून, मिरज तालुक्याच्या अध्यक्षपदी आठ वर्षे, तर सध्या जिल्हा कोषाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या संघटनकौशल्यामुळे कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत बनले आहे. तुकाराम गायकवाड हेही समितीचे सर्वात जुने कार्यकर्ते आहेत. त्यांनीही समितीच्या जिल्हा सहसचिव पदावर काम केले आहे. शिवाय वारकरी संप्रदायातून ते तालुक्यात परिचित आहेत. विनम्रता, कार्यकर्त्यांशी जवळीक यातून ते थेट अध्यक्ष पदाच्या दावेदारीपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे तालुक्यात ‘तुकाराम-हरी’चा जयघोष घुमत आहे. विशेष म्हणजे दोघेही वेळात वेळ काढून एकत्रित आभार दौरा करीत आहेत.