स्थायी सभापतीपदासाठी आवटी, मदने, यमगर यांच्यात रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:28 IST2021-08-23T04:28:20+5:302021-08-23T04:28:20+5:30
सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपमधून निरंजन आवटी, सविता मदने, संजय यमगर यांच्यात जोरदार रस्सीखेच आहे. त्यात सभापतीपद ...

स्थायी सभापतीपदासाठी आवटी, मदने, यमगर यांच्यात रस्सीखेच
सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपमधून निरंजन आवटी, सविता मदने, संजय यमगर यांच्यात जोरदार रस्सीखेच आहे. त्यात सभापतीपद सांगलीला की मिरजेला हा गुंता सुटलेला नाही. महापौर, उपमहापौरपद गमाविल्यानंतर स्थायी समितीवरील वर्चस्व कायम राखण्याचे आव्हानही भाजपसमोर आहे. स्थायी सदस्य निवडीवेळी राष्ट्रवादीने भाजपला खिंडीत गाठण्याचा डाव आखला होता. पण तो फसला. त्यामुळे आता सभापती निवडीवेळी शह-कटशहाचे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेच्या स्थायी समितीत भाजपचे वर्चस्व आहे. भाजपचे नऊ, काँग्रेस चार व राष्ट्रवादीचे तीन सदस्य आहेत. सभापतीपदाच्या गत निवडणुकीत भाजपला हादरा देण्यासाठी जोरदार फिल्डिंग लागली होती; पण ऐनवेळी भाजपच्या नगरसेवकांनी माघार घेतल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचा डाव फसला होता. त्यानंतर झालेल्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत मात्र भाजपला आघाडीने धक्का दिला. आता स्थायी समितीसारखे महत्त्वाचे पदावरील हक्क कायम राखण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे.
स्थायी सदस्य निवडीवेळी राष्ट्रवादीने भाजपची सदससंख्या कमी करण्याचा डाव आखला होता; पण तो फसला. सदस्य निवडी निर्वेधपणे पार पडल्या. स्थायीत कागदावर तरी भाजपचे बहुमत दिसत आहे. त्यात भाजपमध्ये सभापतीपदासाठी इच्छुकांची गर्दी आहे. निरंजन आवटी यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. आवटी यांना महापौरपदाची उमेदवारी ऐनवेळी नाकारण्यात आली. त्यात आवटी गटाचे चार नगरसेवक आहेत. त्यापैकी एक जण आघाडीच्या गळ्याला लागला आहे. या गटाची ताकद पाहता निरंजन आवटी यांना सभापतीपद देऊन भालवण करण्याची शक्यता अधिक आहे. आवटी यांचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी थेट संबंध आहे. आताही सद्स्यपदासाठी त्यांचे नाव चर्चेत नसताना अचानक त्यांना देण्यात आली. धक्कातंत्र देण्यात आवटी माहीर असल्याने सभापतीपदी त्यांचीच वर्णी लागेल, अशी चर्चा भाजपमध्ये आहे.
तर सांगलीतून सविता मदने व संजय यमगर यांनीही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मदने यांना महिला राखीव गटातून महापौरपदाची संधी मिळालेली नाही. त्यांच्यासाठी भाजपमधील एक गट सक्रिय आहे. तर संजय यमगर हे माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी गटाचे आहेत. सूर्यवंशी यांच्यासाठी भाजपच्या वरिष्ठांकडे आमदार सुधीर गाडगीळ शब्द टाकतील, असे बोलले जात आहे.
चौकट
सभापती सांगलीचा की मिरजेचा?
भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्या वर्षी सांगलीवाडीच्या अजिंक्य पाटील यांना संधी देण्यात आली. त्यानंतर सलग दोन वर्षे मिरजेचे संदीप आवटी व पांडुरंग कोरे यांना सभापतीपद मिळाले. त्यामुळे यंदा सांगलीलाच सभापतीपद मिळावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.