मसुचीवाडी प्रकरणात खरे सूत्रधार खुलेआम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2016 02:25 IST2016-05-10T02:01:52+5:302016-05-10T02:25:16+5:30

बोरगावसह परिसरात दहशत कायम : मोलमजुरीला जाणाऱ्या महिलांवरील अत्याचारही दबलेलेच...

The true formulas openly in the Masuchiwadi case | मसुचीवाडी प्रकरणात खरे सूत्रधार खुलेआम

मसुचीवाडी प्रकरणात खरे सूत्रधार खुलेआम

अशोक पाटील -- इस्लामपूर --मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील मुलींच्या छेडछाड प्रकरणावरून बोरगावातील फाळकूटदादा आमसिध्द बबळेश्वर, सागर खोत व इंद्रजित खोत यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन जणू काही वाघ मारल्याचा आव आणला आहे. परंतु या प्रकरणामागचे खरे सूत्रधार खुलेआम फिरत आहेत. तर मुख्य सूत्रधार म्हणून ज्याचे नाव घेतले जात आहे, तो राजेंद्र विठ्ठल पवार-तपकिरे हा खरा सूत्रधार आहे का? असा प्रश्न आहे. या प्रकरणातील पडद्यामागे असणाऱ्या खऱ्या सूत्रधारांविरोधात बोरगाव अथवा मसुचीवाडी येथील एकही नेता अथवा पदाधिकारी बोलण्यास तयार नाही. यामुळेच आजही त्यांची दहशत कायम आहे.मसुचीवाडी, नवेखेड, जुनेखेड, ताकारी, साटपेवाडी, गौंडवाडी, बनेवाडी, फार्णेवाडी येथील विद्यार्थी, विद्यार्थिनी विद्यालयासह महाविद्यालयात शिक्षणासाठी बोरगाव येथे नियमित येतात. गेल्या दोन वर्षांपासून बोरगाव येथील बेफाम झालेल्या काही फाळकूटदादांकडून मुलींची छेड काढण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा घटना वारंवार घडत होत्या. या विरोधात मुलींनी संस्थाचालक तसेच पोलिसांकडे तक्रार केली होती. परंतु या फाळकूटदादांवर वरदहस्त असणारे गावगुंड वेगळेच आहेच. त्यांच्या दहशतीला घाबरुनच गावातील पदाधिकारी, संस्थाचालकांनी फक्त सारवासारव करुन अशा प्रकरणावर पडदा टाकला. यामुळे फाळकूटदादांची दहशत दिवसेंदिवस वाढतच गेली.
मुलींच्या छेडछाडीबरोबर या फाळकूटदादांकडून मोलमजुरीला शेतात जाणाऱ्या महिलांनाही त्रास दिल्याच्या घटना घडल्या आहेत. तक्रार करुन काहीही उपयोग होत नाही म्हणून या फाळकूटदादांचा अन्याय या महिलांनी सहन केला. इस्लामपूर येथे शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींची संख्या पाहता त्यांच्या सुरक्षिततेविषयी कोणीच खबरदारी घेतलेली नाही. बसस्थानक आणि बसमध्ये रोजच छेडछाडीचे प्रकार घडू लागले आहेत.
यातील काही तक्रारी पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचतात, परंतु याची साधी दखलही घेतली जात नाही. बाहेरच्या बाहेरच अशी प्रकरणे मिटवली जात आहेत, तर काही प्रकरणांसाठी याच परिसरातील नेत्यांनी पोलिसांवर दबाव आणून फाळकूटदादांना पाठीशी घातले आहे. त्यामुळेच गावगुंड आता बेफाम व मस्तवाल झाले आहेत.
बोरगाव येथील बोरगाव हायस्कूलमध्ये पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग भरतात. याठिकाणी एक शैक्षणिक संकुल आहे. येथे प्राथमिक ते महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण दिले जाते. पूर्वी हे फक्त मुलींसाठी महाविद्यालय होते. परंतु आता येथे मुलांनाही प्रवेश दिला जात आहे. बोरगाव येथील शैक्षणिक दर्जा चांगला असल्याने परिसरातील गावातील पालकांनी आपल्या मुला-मुलींना बोरगाव येथे शिक्षणासाठी घातले. परंतु गेल्या दोन वर्षांपासून मुलींना होणाऱ्या त्रासाला कंटाळून मसुचीवाडीकरांना आपल्या मुली शिक्षणासाठी बोरगाव येथे न पाठविण्याचा निर्णय घ्यावा लागला. शैक्षणिक संस्थांकडेही याबाबतच्या तक्रारी काही पालकांनी केल्या होत्या. एकूणच पालकांच्या तक्रारींकडे सर्वच स्तरावरून दुर्लक्ष झाल्याने ग्रामसभेच्या ठरावापर्यंत हे प्रकरण गेले आहे. आता तक्रारीला व्यापकता आली असली तरी कारवाई मूळापर्यंत जात नसल्याचे दिसत आहे.
मसुचीवाडीकरांना एवढी टोकाची भूमिका घेईपर्यंत बोरगाव येथील दिग्गज नेत्यांनी काहीच का आवाज उठविला नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.


नेत्यांची चमकोगिरी : पोलिसांची औपचारिकता
बोरगावातील खरे सूत्रधार आजही मोकाट आहेत. मसुचीवाडी प्रकरणातील मुलींना संरक्षण देण्याची भाषा करणारे सर्वच नेते आले आणि निघून गेले. त्यांनी केवळ आपली प्रसिध्दी करून घेतली. पोलिसांनी ताब्यात घेतलेले फाळकूटदादा दोन दिवसात बाहेर येतील. त्यावेळी या मुलींच्या संरक्षणासाठी कोण पुढे येणार? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘स्वाभिमानी’ नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष
डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्याच्या खून प्रकरणात खरे सूत्रधार वेगळेच आहेत. त्यांची नावे आम्ही मुख्यमंत्र्यांना देऊ, अशी भाषा करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत कालांतराने गप्प झाले. आता मसुचीवाडी प्रकरणातही त्यांनी उडी घेतली आहे. त्यांनी बोरगावमधील खऱ्या सूत्रधारांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी सर्वसामान्यांतून होत असल्याचे म्हटले आहे. त्यांच्याही भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

अन्य ठिकाणच्या संरक्षणाचे काय?
मसुचीवाडी येथील ग्रामस्थांनी आपल्या मुलींना होणाऱ्या त्रासाला कंटाळून याबाबत आवाज उठवला. परंतु तालुक्यातीलच इस्लामपूर, आष्टा, कासेगाव, पेठनाका येथेही मोठ्या प्रमाणात मुली शिक्षणासाठी येत असतात. तेथेही त्यांच्या छेडछाडीचे प्रकार घडत असतात. अशा मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

पोलिसांना आव्हान
सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या फाळकूटदादांवर वरदहस्त असणारा एकजण फरारी असला तरी, त्यांच्या पाठीशी अनेकजण आहेत. त्यांचे या भागात अवैध व्यवसाय सुरू आहेत. या व्यवसायाला पोलिसांसह स्थानिक नेत्यांचेही पाठबळ आहे.
यातूनच मिळवलेल्या आर्थिक ताकदीवर हे पडद्यामागचे सूत्रधार सर्व खेळ चालवत आहेत. त्यांची नावे ग्रामस्थांसह स्थानिक नेत्यांना माहीत आहेत. परंतु त्यांची नावे ग्रामसभेत घेतली गेली नाहीत. यामागचे कारण म्हणजे त्यांची दहशतच आहे. ही दहशत मोडून काढण्याचे मोठे आव्हान पोलिस उपअधीक्षक वैशाली शिंदे आणि पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्यापुढे आहे.

Web Title: The true formulas openly in the Masuchiwadi case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.