मनुष्याला बंधनातून मुक्त करते तेच खरे शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:23 IST2021-04-03T04:23:06+5:302021-04-03T04:23:06+5:30
फोटो - भिलवडी वाचनालयास देणगी प्रदान करताना पुरुषोत्तम जोशी, गिरीश चितळे, सुभाष कवडे, संजय कदम आदी उपस्थित होते. लोकमत ...

मनुष्याला बंधनातून मुक्त करते तेच खरे शिक्षण
फोटो - भिलवडी वाचनालयास देणगी प्रदान करताना पुरुषोत्तम जोशी, गिरीश चितळे, सुभाष कवडे, संजय कदम आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी
: शिक्षण म्हणजे केवळ साक्षरता नसून, मनुष्याला बंधनातून मुक्त करते तेच खरे शिक्षण असल्याचे मत उद्याेजक गिरीश चितळे यांनी व्यक्त केले.
‘माझे शैक्षणिक विषयावरील वाचन’ या विषयावर भिलवडी सार्वजनिक वाचनालयाच्या वाचन कट्ट्यावर चर्चा करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक संजय कदम म्हणाले की, प्राथमिक स्तरावर शिक्षणाचा खऱ्या अर्थाने पाया भरला जातो. जीवनाच्या परीक्षेत जिंकण्याची मानसिकता असणारी पिढी निर्माण करण्याचे काम शिक्षक व शिक्षणाच आहे. बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील प्रा. एम. आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्ये अंगभूत असणाऱ्या शारीरिक क्षमतांचा विकास
झाल्यास त्यांच्या गुणवत्तेमध्ये ही बदल घडतो. त्या दृष्टीने शारीरिक शिक्षण या विषयालाही शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळींनी काळाबरोबर स्वतःच्या ज्ञानाचा स्तर वाढविला पाहिजे, त्यासाठी वाचन महत्त्वाचे असल्याची भूमिका मांडली.
पुरुषोत्तम जोशी यांनी ग्रंथ खरेदीसाठी वाचनालयास देणगी दिली.
डी. आर. कदम, हणमंत जोशी, पुरुषोत्तम जोशी, रमेश चोपडे, संदीप नाझरे, संजय पाटील, शरद जाधव, हणमंत डिसले, आरती बाबर आदी उपस्थित होते.