पोलीस उपनिरीक्षकावर ट्रक चालकाचा हल्ला

By Admin | Updated: March 25, 2015 00:41 IST2015-03-25T00:04:26+5:302015-03-25T00:41:39+5:30

उसाने मारहाण : कागदपत्रे मागितल्याचा राग

Truck driver attack on police sub-inspector | पोलीस उपनिरीक्षकावर ट्रक चालकाचा हल्ला

पोलीस उपनिरीक्षकावर ट्रक चालकाचा हल्ला

आष्टा : इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कार्तिकस्वामी शिंदे (वय ३२) हे आष्टा-इस्लामपूर रस्त्यावर रात्रीच्यावेळी गस्त घालत असताना, गाताडवाडी बस स्टॉपजवळ थांबलेल्या ट्रक चालकास त्यांनी परवाना व इतर कागदपत्रे मागितल्यानंतर ट्रकचालक शहादेव उत्तम पालवे (रा. कोला, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) याने शिंदे यांना उसाने मारहाण केली, तसेच अंगावर धाऊन येऊन शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद आष्टा पोलिसांत दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांच्याकडे सोमवारी इस्लामपूर-आष्टा या परिसरातील रात्रगस्तीचे काम होते. सरकारी जीप (क्र. एमएच १०/एन ६५६) घेऊन इस्लामपूर शहरात गस्त घालून ते रात्री २.१५ वाजता आष्टा येथे आले. रात्री आष्टा शहरात पेट्रोलिंग करून पुन्हा इस्लामपूरकडे जात असताना गाताडवाडी फाट्यानजीक रात्री तीनच्या दरम्यान आले असता ट्रक (क्र. एमएच १६/ एवाय ५५००) हा बसस्टॉपसमोर लावलेला दिसला. ट्रकचालक गाडीत झोपला होता. त्यास उठवून, ‘तुम्ही रस्त्यात गाडी लावली आहे, त्यामुळे अपघात होऊ शकतो. चोरांचाही धोका आहे’, असे सांगितले. त्यावेळी चालकाने ‘मी गाडी कोठेही थांबवेन व कधीही झोपेन, तुला काय करायचे’ असे उध्दट उत्तर दिले. शिंदे यांनी वाहन चालविण्याचा परवाना व इतर कागदपत्रे मागितली. यावर शहादेव पालवे याने, ‘आम्ही काय विनापरवाना गाडी चालवतो काय’, असे म्हणून खाली पडलेल्या उसाने शिंदे यांना मारहाण केली. पोलीस नाईक लुगडे व शिंदे यांनी चालक पालवे यास धरले. आष्टा व इस्लामपूर पोलीस आल्यानंतर त्यास आष्टा पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
पोलीस वर्दी असताना शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण करून जखमी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पालवे याच्याविरुध्द कलम ३५३, ३३२, ३२३, ३२४ प्रमाणे फिर्याद देण्यात आली आहे. (वार्ताहर)

Web Title: Truck driver attack on police sub-inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.