ट्रक-कार धडकेत पलूसचे दोघे ठार
By Admin | Updated: November 9, 2016 22:50 IST2016-11-09T22:50:10+5:302016-11-09T22:50:10+5:30
आगळगाव फाट्यावर अपघात : देवदर्शनाहून परतताना दुर्घटना

ट्रक-कार धडकेत पलूसचे दोघे ठार
ढालगाव : मिरज-पंढरपूर राज्यमार्गावरील आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) हद्दीत ट्रक व कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पलूस येथील गणेश जितेंद्र कोळी (वय २१) व अशोक यशवंत कोळी (५४) हे दोघे जागीच ठार झाले. अपघातात अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास घडला.
मिरज-पंढरपूर राज्यमार्गावर बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास मालवाहतूक ट्रक (क्र. एमएच १४- ८०७१) हा सोलापूरच्या दिशेने निघाला होता, तर पलूस येथील कोळी कुटुंबीय तुळजापूर, अक्कलकोट देवदर्शन करून कारमधून (क्र. एमएच १० सीए ७४३९) पलूसला परतत होते. आगळगावच्या हद्दीत दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात गणेश व अशोक कोळी हे जागीच ठार झाले. अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलिसांत झाली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन वसमळे, संजय जाधव करीत आहेत. (वार्ताहर)
अशोक कोळी शिक्षक
मृत अशोक कोळी हे पलूस येथे शिक्षक होते. जखमींमध्ये सुवर्णा अशोक कोळी (वय ५३), संगीता राजेंद्र कोळी (४०) व साक्षी सुनील कोळी (१३) यांचा समावेश आहे.