फलक फाडल्याने कोंगनोळीमध्ये तणाव

By Admin | Updated: April 28, 2015 00:31 IST2015-04-27T23:48:55+5:302015-04-28T00:31:43+5:30

कवठेमहांकाळ तालुक्यात पडसाद : बसवरील दगडफेकीत वाहनचालक जखमी; सर्वत्र निषेध

Troubles in cognonis due to tearing off | फलक फाडल्याने कोंगनोळीमध्ये तणाव

फलक फाडल्याने कोंगनोळीमध्ये तणाव

कवठेमहांकाळ : कोंगनोळी येथील मुख्य चौकामध्ये लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकावरील महापुरुषाच्या प्रतिमेची अज्ञाताने विटंबना केल्यानंतर कोंगनोळीसह कवठेमहांकाळ शहरात तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने कोंगनोळी येथे एसटी बसवर दगडफेक केली. या दगडफेकीत वाहनचालक जखमी झाला आहे. कवठेमहांकाळमध्ये काही वाहनांवर दगडफेक करून चौकामध्ये टायर पेटवून निषेध व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांनी शहर बंदची हाक दिली. त्यानंतर संपूर्ण शहर बंद ठेवण्यात आले. कार्यकर्त्यांनी दोन्ही ठिकाणी निषेध फेरी काढली. कोंगनोळी येथे मुख्य चौकात शुभेच्छा संदेश देणारे डिजिटल फलक लावण्यात आले होते. रविवारी रात्रीच्यावेळी अज्ञाताने महापुरुषाच्या डिजिटल फलकाची विटंबना केली. सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कोंगनोळीतील कार्यकर्ते एकत्रित झाले. त्याचवेळी सोशल मीडियावरून ही बातमी संपूर्ण तालुकाभर झाली.
कोंगनोळी येथे जमावाने सलगरेकडून कवठेमहांकाळकडे येत असलेल्या एसटीवर दगडफेक केली. यामध्ये एसटीच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच एसटी चालक दगड लागल्यामुळे जखमी झाला. जमावाने रस्त्यावर टायर पेटवून निषेध व्यक्त केला.
माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी कोंगनोळीत येऊन शांततेचे आवाहन केले. त्याचबरोबर मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग बनसोडे, कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक युवराज मोहिते हेही घटनास्थळी हजर झाले. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी गावातून फेरी काढून शांततेचे आवाहन केले. घोरपडे यांच्याहस्ते गावात महापुरुषांच्या प्रतिमेचा नवीन डिजिटल फलक लावण्यात आला. निषेध फेरीमध्ये माजी राज्यमंत्री घोरपडे यांच्यासह नानासाहेब वाघमारे, पिंटू माने, शंकर माने, अरुण आठवले, परशराम पाटील, धनराज कांबळे, नितीन काटे, उत्तम काटे सहभागी झाले होते.
कवठेमहांकाळ शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी कोंगनोळीकडे धाव घेतली. कवठेमहांकाळ येथील जुने एसटी स्थानक परिसरात कार्यकर्ते जमा झाले. लालासाहेब वाघमारे, प्रदीप चंदनशिवे, महावीर माने, सुधीर माने, प्रशांत चंदनशिवे, अमोल धेंडे, विजय साठे, सचिन वाघमारे, महेश माने, संभाजी भोसले, विजय साठे आदींनी शहरातून निषेध फेरी काढली. त्याचबरोबर शहर बंद ठेवण्याची हाक देण्यात आली. त्यानुसार दिवसभर शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. संतप्त जमावाने तहसील कार्यालयासमोरील चौकात टायर पेटवले. काही वाहनांवर जमावाने दगडफेक केली, तर काही वाहनांची तोडफोड केली. तहसील कार्यालयासमोरील चौकात काही वेळ रास्ता रोको करण्यात आला. तहसीलदार सचिन डोंगरे यांनी शहरातील मुख्य चौकात जाऊन जमावाला शांततेचे आवाहन केले. (वार्ताहर)


कवठेमहांकाळ बंदची हाक
कोंगनोळीतील मुख्य चौकात शुभेच्छा देणारे डिजिटल फलक लावण्यात आले होते.
रविवारी रात्री हा फलक अज्ञातांनी फाडून टाकला
या घटनेनंतर कोंगनोळीत तणाव निर्माण झाला. यावेळी जमावाने कवठेमहांकाळ-सलगरे या एसटी बसवर दगडफेक केली.
या दगडफेकीत एसटी चालक ज्ञानू पाटील जखमी झाले
या घटनेचे तालुकाभर पडसाद मटले. कवठेमहांकाळ येथे कार्यकर्त्यांनी शहर बंदची हाक दिली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

Web Title: Troubles in cognonis due to tearing off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.