शिक्षण सेवक सोसायटी सभेत गोंधळ
By Admin | Updated: July 27, 2015 00:30 IST2015-07-26T23:20:50+5:302015-07-27T00:30:24+5:30
कर्जमर्यादा वाढविणार : पेठभाग शाखेतील भ्रष्टाचाराच्या खुलाशाची मागणी

शिक्षण सेवक सोसायटी सभेत गोंधळ
सांगली : पेठभाग शाखेमध्ये भ्रष्टाचार झाला असून, याबाबत खुलासा करण्यात यावा, या मागणीवरून येथील शिक्षण सेवक सहकारी सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी गोंधळ घातला. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एन. डी. बिरनाळे होते.येथील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात रविवारी शिक्षण सेवक सोसायटीची ८२ वी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपाध्यक्ष संतोषकुमार गायकवाड, संचालक रवींद्र गवळी, सौ. अनुजा पाटील, अंजनी साळुंखे, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. अध्यक्ष बिरनाळे अहवाल वाचन करीत असतानाच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. संस्थेच्या पेठभाग शाखेत इमारत दुरुस्ती व इतर कारणांवरून पंधरा लाखांचा भ्रष्टाचार झाला असून, याचा खुलासा करण्यात यावा, अशी मागणी विकास पाटील, बजरंग संकपाळ आदींनी केली. संचालक मंडळाने, विकास पाटील यांच्याच अध्यक्षतेखाली समिती नेमतो, तुम्हीच याची चौकशी करावी, अशी सूचना केली. त्यानंतर वाद सुरू झाला. संचालक मंडळाचा कालावधी आता संपला असून, यासंदर्भात वेळकाढू धोरण अवलंबिण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
आॅनररी सचिव पदाचा राजीनामा देणाऱ्यांची पुन्हा तज्ज्ञ संचालकपदी नियुक्ती कशी करण्यात आली? असाही प्रश्न सभेत उपस्थित झाल्याने वादाला सुरुवात झाली. आॅनररी सचिव यापूर्वी संचालकपदी होते व त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी त्यांची नियुक्ती केल्याचा खुलासा संचालकांनी केला. प्रत्येकवर्षी संस्थेचे आॅडिट शुल्क अकरा लाख होत असताना, यावर्षी ६ लाखच कसा खर्च झाला? यापूर्वी खर्च अधिक कसा झाला? असा प्रश्न उदय पाटील, दत्ता पाटील आदींनी केला. यावर यावर्षी शासनाने आॅडिट शुल्क कमी केल्याचे सांगण्यात आले. यावरून समाधान न झाल्याने विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवला.
अध्यक्ष बिरनाळे म्हणाले की, सध्याची कर्जमर्यादा बारा लाखांची असून, ती अपुरी आहे. सर्वांच्या मागणीनुसार कर्जमर्यादा वीस लाखाची करण्याचा प्रस्ताव असून तो सहकार मंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे. संस्थेने भागभांडवलावर १३.२५ टक्के लाभांश दिला असून, भागभांडवलात ३ कोटी ४८ लाख ३ हजाराने वाढ झाली आहे. यावर्षी संस्थेच्या ठेवींत २५ कोटी ४१ लाखाची वाढ झाली असून कर्ज वितरणात १७ कोटी २० लाखाची वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)
केवळ विरोधासाठी विरोध : बिरनाळे
विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नव्हते. त्यांनी केवळ विरोधासाठी विरोध करण्याचे धोरण अवलंबल्यामुळेच सभेत गोंधळ झाला, असा आरोप अध्यक्ष बिरनाळे यांनी केला. संस्थेने यंदाच्या आर्थिक वर्षात चौफेर प्रगती केली आहे. याचे आकडे आहेत. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधकांचा गोंधळ होता, त्यामध्ये काहीही तथ्य नव्हते. विरोधकांनी मात्र ही सभा गुंडाळल्याचा आरोप केला. स्वागत उपाध्यक्ष संतोषकुमार गायकवाड यांनी केले, तर अहवाल वाचन रवींद्र गवळी यांनी केले. यावेळी विजयकुमार बोराडे, मनोहर शिंदे, सर्जेराव पाटील, संताजी घाडगे, अर्जुन पाटील, मोहन वनखंडे आदी उपस्थित होते.