जत : जत शहर आणि तालुक्याचा विकास आराखडा तयार करुन त्याला मूर्तस्वरुप देण्यासाठी मंत्रालय पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. परंतु त्यासाठी तालुक्यातील जनतेचे मला पाठबळ आवश्यक आहे, असे मत आमदार विलासराव जगताप यांनी व्यक्त केले.जत शहर आणि तालुक्यातील नागरिकांच्यावतीने गांधी चौक जत येथे आमदार विलासराव जगताप यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. मी तालुक्यातील जनतेचा प्रतिनिधी म्हणून यापुढील पाच वर्षे काम करणार आहे. पक्ष, गट, तट यामध्ये याला स्थान असणार नाही. मी जरी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आलो असलो तरी मंत्री अथवा इतर कोणीही असो त्यांच्या दबावाखाली काम करणार नाही, असा इशारा देऊन आमदार विलासराव जगताप पुढे म्हणाले की, तालुक्यात म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे पाणी आणणे, जत तालुक्याचे विभाजन करणे, खराब रस्ते दुरुस्त करणे, कृषी महाविद्यालयात मंजूर करून आणणे या कामांची पूर्तता करण्याचा माझा सतत प्रयत्न राहणार असून, मंत्री पदापेक्षाही हे काम मोठे आहे. येथील प्रस्थापितांच्या विरोधात मी राजकारणात आलो होतो. तीस वर्षानंतर मला त्यामध्ये यश मिळाले आहे. त्यामुळे इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचे आणि कायम स्मरणात राहणारे काम मी करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.यावेळी बाजार समिती माजी सभापती प्रकाश जमदाडे, सुरेश शिंदे, अॅड. प्रभाकर जाधव, शिवाजीराव ताड, नगरसेवक उमेश सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. रवींद्र आरळी, प्रमोद सावंत, बाजी केंगार, रमेश बिराजदार, इकबाल गवंडी, महादेव कोळी, नगराध्यक्ष रवींद्र साळे, माया साळे, नंदा कांबळे, संगीता माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
जतच्या विकास आराखड्यासाठी प्रयत्न
By admin | Updated: November 18, 2014 23:25 IST