झाडे पडली, खांब कलले, तारा तुटल्या
By Admin | Updated: May 28, 2014 00:51 IST2014-05-28T00:51:27+5:302014-05-28T00:51:35+5:30
वादळी पाऊस : वाहनांचे नुकसान, वीजपुरवठा खंडित, घरांवरील पत्रे, कौले उडाली, संसार उघड्यावर

झाडे पडली, खांब कलले, तारा तुटल्या
सांगली : अवकाळी वादळी पावसाने जिल्हाभर पडझड होऊन मोठी हानी झाली. जिल्ह्याच्या विविध भागात झाडे पडून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. विजेच्या तारा तुटल्याने अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. मोहितेवडगाव येथे वादळी वार्याने लाकडी खांब डोक्यात पडून एकजण जखमी झाला आहे. वादळी पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. सांगली शहर परिसराला आज (मंगळवार) वादळी वार्यासह अवकाळी पावसाने झोडपले. सुमारे तासभर झालेल्या पावसाने चार ठिकाणी झाडे व फांद्या तुटून पडल्या. शास्त्री चौक, कोल्हापूर रस्ता येथे झाडे वाहनांवर पडल्याने मोटारीसह दुचाकीचे नुकसान झाले. वादळी वारा सुटताच शहरातील वीजपुरवठा सुमारे पाऊण तास बंद करण्यात आला होता. दुपारी दोनच्या सुमारास वादळी वार्याला सुरुवात झाली. त्यापाठोपाठ मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. सुमारे तासभर पाऊस झाला. यामुळे दत्त-मारुती रोड, स्टेशन चौक, शिवाजी मंडई, न्यायालय परिसर आदी ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी वार्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजयनगर येथील शहरी बस थांब्यानजीक झाड उन्मळून पडले. कोल्हापूर रस्त्यावरील एसटीच्या प्रशासकीय कार्यालयासमोर ‘रेन ट्री’ उन्मळून मोटारीवर पडले. यामुळे मोटारीचे नुकसान झाले. शास्त्री चौकात असलेल्या झाडाची फांदी तुटून दोन दुचाकीवर पडल्याने दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले. जिल्हा परिषदेसमोर असलेल्या झाडाची फांदी तुटून पडल्याने चहाची टपरी उद्ध्वस्त झाली. (प्रतिनिधी)