एसटीने प्रवास करताय, सॅनिटायझर घेतलाय ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:20 IST2021-06-04T04:20:40+5:302021-06-04T04:20:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दोन महिन्यापासून थांबलेल्या लालपरीची चाके पुन्हा धावू लागली आहेत. प्रवाशांची वर्दळ हळूहळू वाढू लागली ...

एसटीने प्रवास करताय, सॅनिटायझर घेतलाय ना?
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दोन महिन्यापासून थांबलेल्या लालपरीची चाके पुन्हा धावू लागली आहेत. प्रवाशांची वर्दळ हळूहळू वाढू लागली आहे. पण जिल्ह्यातील कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने प्रवाशांना मास्क बंधनकारक केला आहे. महामंडळाकडून एसटीचे सॅनिटायझेशन केले जात असले तरी प्रवाशांनीही खबरदारी म्हणून सॅनिटायझरचा वापर करण्याची आवश्यकता आहे.
सांगलीसह विविध आगारांतून बसेसच्या दररोज ९०० फेऱ्या होतात. लाॅकडाऊनमुळे दोन महिन्यापासून प्रवासी सेवेवर परिणाम झाला होता. साऱ्याच बसेस आगारात होत्या. आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. एसटी महामंडळालाही प्रवासी सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. लालपरी पुन्हा रस्त्यावर धावू लागली आहे. पण अद्याप पूर्णक्षमतेने सेवा सुरू झालेली नाही. सध्या केवळ ६६ फेऱ्याच सुरू आहेत. त्यात जिल्ह्यांतर्गत सेवेसह कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्याचाही समावेश आहे.
एसटीची चाके पुन्हा धावू लागली असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही संपुष्टात आलेला नाही. त्यामुळे प्रवाशांना मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. महामंडळाकडून कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. तरीही प्रवाशांनी स्वत:च्या आरोग्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याची आवश्यकता आहे.
चौकट
महामंडळाकडून निर्जंतुकीकरण
सकाळी ७ ते ९ व दुपारी ४ ते ६ यावेळेच बसेस सोडल्या जात आहेत. प्रत्येक फेरीनंतर बसेसचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. प्रवाशांना मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. पण सीटचे सॅनिटायझेशन मात्र प्रवाशांकडून केले जात नव्हते.
चौकट
५५ कोटींचा तोटा
सांगली आगाराला गेल्या दीड महिन्यात ५५ कोटींचा तोटा झाला आहे. एप्रिलमध्ये २० कोटी, तर मे महिन्यात २५ कोटीचे नुकसान झाल्या. गतवर्षीही कोरोना काळात मोठा तोटा सहन करावा लागला होता.
चौकट
प्रवासी घरात
गेल्या तीन दिवसांपासून रस्त्यावर बसेस धावत असल्या तरी अद्याप प्रवाशांचा प्रतिसाद म्हणावा तितका नाही. पहिल्या दिवशी केवळ १० टक्केच प्रवासी होते. दुसऱ्या दिवशी मात्र त्यात २० टक्क्यापर्यंत वाढ झाली.
चौकट
एसटीची सर्वाधिक वाहतूक जत मार्गावर
१. सध्या सांगली आगारातून ६६ फेऱ्या सुरू आहेत. त्यात सांगली-कोल्हापूर, इचलकरंजी आणि तालुकानिहाय सेवा सुरू करण्यात आली आहे.
२. सकाळी ७ ते ९ आणि दुपारी ४ ते ६ यावेळेतच बसेस रस्त्यावर धावत आहेत.
३. एसटीची सर्वाधिक वाहतूक जत मार्गावर सुरू आहे. या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसादही चांगला आहे. त्यामुळे या मार्गावर जादा वाहतूक सुरू आहे.
चौकट
बस सुरू झाली आणि जिवात जीव आला
- एसटी चालू झाल्यानंतर समाधान वाटले. पण प्रवासीच नाहीत. एसटीचे पूर्ण सॅनिटायझेशन केले आहे. मास्कशिवाय प्रवेश दिला जात नाही. लालपरी रस्त्यावर धावली पाहिजे. त्याची चाके थांबून उपयोग नाही.
- प्रदीप कुंभार, वाहक
- लाॅकडाऊनमध्ये घरीच बसून होतो. त्यामुळे कंटाळा आला होता. कधी एसटी स्टार्ट करतो, असे झाले होते. एसटीने पुन्हा सुरू झाल्याचा आनंद झाला. काम करायला हुरूप आला आहे.
- हणमंत कांबळे, चालक
चौकट
जिल्ह्यातील एकूण बसेस : ७५०
सद्या सुरू असलेल्या बसेसे : १००
एकूण कर्मचारी : ४५००
सध्या कामावर असलेले वाहक : १००
सध्या कामावर असलेले चालक : १००
वाहक : १३५०
चालक १२१५