वाहतूकदार सापडलेत रस्त्यांच्या चक्रव्यूहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST2021-02-05T07:32:20+5:302021-02-05T07:32:20+5:30

दिघंची ते आटपाडीदरम्यान राज्यमार्गाचे काम सुरू आहे. कॉंक्रिटीकरणाचा रस्ता पूर्ण झाला नसल्याने वाहतूकदारांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. लोकमत ...

Transporters were found in a maze of roads | वाहतूकदार सापडलेत रस्त्यांच्या चक्रव्यूहात

वाहतूकदार सापडलेत रस्त्यांच्या चक्रव्यूहात

दिघंची ते आटपाडीदरम्यान राज्यमार्गाचे काम सुरू आहे. कॉंक्रिटीकरणाचा रस्ता पूर्ण झाला नसल्याने वाहतूकदारांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महामार्गांमुळे जिल्ह्याच्या विकासाची गाडी सुसाट धावणार आहे, पण सध्या तरी जिल्हा अर्धवट कामांच्या चक्रव्यूहात अडकला आहे. अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर राज्यमार्ग किंवा महामार्गाची कामे सुरू असल्याने वाहतूकदार हैराण झाले आहेत.

प्रत्येक तालुक्यात रस्त्यांची कामे अखंडपणे सुरू आहेत. मिरज-पंढरपूर, दिघंची- महूद, गुहागर-विजापूरपैकी कडेगाव-जत, पलूस-कडेगाव या प्रमुख रस्त्यांचा वनवास संपण्याची चिन्हे सध्यातरी नाहीत. या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यांची कामे गतीने करण्याचे गांभीर्य प्राधिकरणाकडे नाही. रत्नागिरी-नागपूर महामार्ग क्रमांक १६६ चे काम मिरज-पंढरपूर रस्त्यावर अनेक वर्षांपासून सुरू आहे. ठिकठिकाणी अनेक डायव्हर्शन्स, पुलांसाठी केलेली खोदकामे, अर्धवट झालेले कॉंक्रिटीकरण, अर्धवट पुलांचे सांगाडे अशी अडथळ्यांची शर्यत आहे. मिरज-पंढरपूर हा १२७ किलोमीटरच्या दोन-अडीच तासांच्या प्रवासासाठी आता चार तास लागताहेत.

महूद-दिघंची-आटपाडी-भिवघाट या रस्त्याची अवस्थाही अशीच आहे. अर्धवट झालेली कामे अपघातांना आमंत्रण देताहेत. रात्रीचा प्रवास म्हणजे चक्रव्यूहातून सुटका करुन घेण्यासारखी स्थिती आहे. गुहागर-विजापूर महामार्गाचे काम वर्षानुवर्षे डोकेदुखी ठरले आहे. पावसाळ्यात कडेगाव भागात अपघातांची मालिका सुरू होते. विटा ते दहीवडी रस्त्याची अवस्थाही शोचनीय आहे. ठिकठिकाणी अखंड दुरुस्त्या सुरू आहेत. हेरवाड-दिघंची राज्यमार्गापैकी मिरज-सलगरे रस्त्याचे कामही अजून संपलेले नाही. मिरज ते अंकली रस्त्यावर रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम सुरू असून, अनेक वळणे व अर्धवट कॉंक्रिटीकरणातून वाट शोधावी लागते.

चाैकट

येथे आहे रस्त्यांचा चक्रव्यूह

मिरज - अंकली, दिघंची - आटपाडी, मिरज -पंढरपूर रस्ता, मिरज- सलगरे, कराड- पलूस, पलूस - कडेगाव, कडेगाव - जत, विटा - दहीवडी, दिघंची - भिवघाट

कोट

रस्त्यांच्या चक्रव्यूहामुळे प्रचंड त्रास होत आहे. इंधनाचा खर्च वाढला आहे. त्याचा परिणाम भाडेवाढीमध्ये झाला आहे. महामार्ग भविष्यात सुखकारक ठरणार असला तरी सध्या मात्र प्रचंड त्रास सोसावा लागत आहे.

बाळासाहेब कलशेट्टी, अध्यक्ष, सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन

--------------

Web Title: Transporters were found in a maze of roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.