नेवरीमध्ये बसणार ट्रान्स्फॉर्मर
By Admin | Updated: September 3, 2015 23:40 IST2015-09-03T23:40:15+5:302015-09-03T23:40:15+5:30
ऊर्जामंत्र्यांकडून आत्मदहनाच्या इशाऱ्याची दखल : ऊर्जा मंत्रालयाची माहिती

नेवरीमध्ये बसणार ट्रान्स्फॉर्मर
गणेश पवार- नेवारी नेवरी (ता. कडेगाव) येथील सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या वीज ट्रान्स्फॉर्मरच्या कामाबाबत शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये गुरुवारी प्रसिध्द होताच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन, तात्काळ ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात यावा, असा आदेश दूरध्वनीवरून दिला. त्यानंतर येत्या दोन दिवसात ट्रान्स्फॉर्मर बसविण्याच्या सूचना कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता आर. बी. बुरूड यांनी दिल्या. गेल्या सहा महिन्यांपासून या परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. ठेक ा दिलेल्या कंपनीच्या मनमानीमुळे ट्रान्स्फॉर्मर बसविण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. या परिसरात दीड हजार एकर ऊसक्षेत्र आहे. शेतक ऱ्यांनी कर्जे उचलून पाणी योजना राबविल्या आहेत. येरळा नदीमध्ये ताकारी योजनेचे पाणी असूनही, ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे ट्रान्स्फॉर्मर बसविला नाही. परिणामी शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता येत नाही. वीज कंपनीच्या स्थानिक कार्यालयाकडे हेलपाटे मारून शेतकरी वैतागले होते.
शेवटी शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर मुंबईपासून कोल्हापूर-सांगलीपर्यंत दूरध्वनी वाजू लागले आणि सहा महिन्यांचे प्रलंबित काम ‘लोकमत’च्या वृत्ताने एका दिवसात मार्गी लागले. येत्या दोन दिवसात ट्रान्स्फॉर्मर चालू करण्याची माहिती कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता आर. बी. बुरूड यांनी दिली. नेवरी विद्युत महामंडळ कार्यालयातील कनिष्ठ अभियंता एस. ए. पवार यांचे काम पूर्ण झाले असून वरिष्ठ कार्यालयाच्या दुर्लक्षामुळेच काम अपुरे आहे, अशी कार्यालयातून माहिती मिळाली. याबाबत अतिरिक्त कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता यांनाही ऊर्जा कार्यालयातून काम पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
‘लोकमत’चे कौतुक
गुरुवारी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ काम पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. दुपारी बारा वाजल्यापासून पाचपर्यंत ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचा निर्णय कोल्हापूर वरिष्ठ कार्यालयातून घेण्याचे निश्चित झाले. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ वर्गातून ‘लोकमत’चे कौतुक होत आहे.
नेवरीच्या शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी तात्काळ ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे फर्मान महावितरणच्या अधिकाऱ्यांना सोडले आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. संबंधित कार्यालयाकडे दूरध्वनीद्वारे काम सुरू करावे, असे आदेशही देण्यात आले.