जत : जत शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी अत्यावश्यक सेवा वगळता दुपारी चारपर्यंतच आपला व्यवसाय करावा. नियम न पाळणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने सील करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जतचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी दिला.
प्रशासनाने लाॅकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्याने शहरातील प्रमुख बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. सांगली जिल्हा हा तिसरे टप्प्यात येत असल्याने जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी सर्व व्यावसायिकांना अत्यावश्यक सेवा, हाॅस्पिटल, मेडिकल दुकाने व दूध डेअरी वगळता सर्व आस्थापनांना सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
प्रशासनाने आदेश देऊनही जत शहरात दुपारी चारनंतरही सर्वच दुकाने उघडी असतात. दुकानदारांकडून किंवा ग्राहकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. त्यामुळे शहरात मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.
पोलीस प्रशासनाने दुपारी चारनंतरही बाजारपेठेत सर्व व्यवहार बंद करण्याचे वारंवार आवाहन करूनही व्यापारी वर्गाकडून प्रतिसाद मिळत नाही. यामुळे जतचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी जतमधील सराफ व्यावसायिक, कापड व्यापारी असोसिएशन, जत शहर व्यापारी असोसिएशन, बेकरी व्यावसायिक, किराणा व्यावसायिक यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. व्यापारी बंधूंना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जे आदेश दिले आहेत त्या आदेशानुसार दुपारी चारनंतर कोणीही आपली दुकाने उघडी ठेवणार नाही. याची दक्षता व्यापारी बांधवांनी घ्यावी. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.