तासगावात महाविकास आघाडीचे त्रांगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:35 IST2021-06-09T04:35:17+5:302021-06-09T04:35:17+5:30
दत्ता पाटील तासगाव : तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. राज्याच्या महाविकास ...

तासगावात महाविकास आघाडीचे त्रांगडे
दत्ता पाटील
तासगाव : तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. राज्याच्या महाविकास आघाडीत एकत्रित नांदत असलेल्या राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांचे नगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र त्रांगडे झाल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. राष्ट्रवादीची ‘एकला चलो रे’ची भूमिका दिसून येत असून, काँग्रेस आणि शिवसेनेने मात्र सूर जुळवल्याचे दिसत आहे.
तासगाव नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. विरोधी बाकावर राष्ट्रवादी आहे. गत निवडणुकीत शिवसेना अस्तित्वशून्य होती. काँग्रेसने राष्ट्रवादीशी फारकत घेऊन स्वबळावर निवडणूक लढवून उपद्रवमूल्य दाखवून दिले होते. यावेळी नगरपालिका निवडणुकीत अनेक समीकरणे बदलली आहेत. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी अनेक विकासकामे करून मांड पक्की केली आहे. त्यामुळे खासदार गटाला पुन्हा एकदा नगरपालिकेत भाजपचा झेंडा फडकणार असा आत्मविश्वास आहे. त्यामुळे भाजपचे नगरसेवक सध्यातरी मी पुन्हा येणार, याच अविर्भावात आहेत.
विरोधी बाकावर असणाऱ्या राष्ट्रवादीचा गेल्या पाच वर्षांत विरोधक म्हणून प्रभाव पडला नाही. मात्र राज्यात सत्तेत आल्यामुळे, राज्यातील सत्तेच्या वरदहस्तच्या जिवावर नगरपालिकेची सत्ता सहज ताब्यात येईल, या अविर्भावात राष्ट्रवादीचे कारभारी असल्याचे दिसतात. त्यामुळे महाविकास आघाडीचे कडबोळे न घेता त्यांनी शिवसेना आणि काँग्रेसपासून फारकत घेत स्वबळावर नगरपालिका निवडणूक लढविण्यासाठी जुळवाजुळव सुरू केली आहे.
मागील निवडणुकीत उपद्रवमूल्य दाखवून दिलेल्या काँग्रेसने यावेळी निवडणुकीच्या रिंगणात जोरदारपणे उतरण्याची तयारी सुरू केली आहे. तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी अन्य पक्षातील कार्यकर्त्यांची फोडाफोडी करून काँग्रेससाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अलीकडच्या काळात भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नव्या कारभाऱ्यांनी अस्तित्व दाखवून देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोरोनाच्या लाटेतदेखील भाजपमधील पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश देण्याचे काम केले जात आहे.
काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी पक्ष वाढवत नगरपालिका निवडणूक टार्गेट केली आहे. भाजप, राष्ट्रवादीसारख्या प्रस्थापितांना टक्कर देण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसने सुरात सूर मिसळले आहेत. राज्यात महाविकास आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आहेत. तासगाव नगरपालिका निवडणुकीतदेखील आतापासूनच शिवसेना आणि काँग्रेसने सुरात सूर मिसळला असला, तरी राष्ट्रवादीची भूमिका फारकत घेणारी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन भाजपची सत्ता उलथवून लावणार की या तिन्ही पक्षांचे त्रांगडे निवडणुकीतदेखील कायम राहणार, हे पाहावे लागणार आहे.