मिरज कोविड रुग्णालयासाठी शंभर प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:26 IST2021-05-14T04:26:18+5:302021-05-14T04:26:18+5:30
मिरज शासकीय कोविड रुग्णालयात जिल्ह्यातील कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मिरज सिव्हिलमध्ये कोविड रुग्णालयात ३७५ खाटांची व्यवस्था आहे. ...

मिरज कोविड रुग्णालयासाठी शंभर प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांना प्रशिक्षण
मिरज शासकीय कोविड रुग्णालयात जिल्ह्यातील कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मिरज सिव्हिलमध्ये कोविड रुग्णालयात ३७५ खाटांची व्यवस्था आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी येथे प्रशिक्षणार्थी निवासी पदव्युत्तर व प्राध्यापक असे १६० डाॅक्टर काम करीत आहेत. मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून दरवर्षी १५० विद्यार्थी वैद्यकीय पदवी घेतात. मात्र, यावर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर एमबीबीएस परीक्षा उशिरा पार पडली. साडेचार वर्षे वैद्यकीय शिक्षणानंतर परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात एक वर्ष प्रशिक्षण कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
कोरोना साथीच्या काळात सध्या या प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांची आवश्यकता आहे. मात्र, यावर्षी एमबीबीएस परीक्षा उशिरा झाल्याने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांची प्रतीक्षा होती. आता वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झालेले शंभर प्रशिक्षणार्थी डाॅक्टर कोविड रुग्णालयात काम करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. कोविड रुग्णालयात डाॅक्टरांना दहा दिवसांत तीन दिवस सुट्टी द्यावी लागते. कोरोनाची बाधा झाल्यास डाॅक्टरांना विलगीकरणात पाठवावे लागते. यासह वेगवेगळ्या कारणाने कोविड रुग्णालयात डाॅक्टरांची संख्या अपुरी पडत असताना यावर्षी वैद्यकीय परीक्षेत उत्तीर्ण झालेले शंभर प्रशिक्षणार्थी डाॅक्टर उपलब्ध झाल्याने सिव्हिल प्रशासनावरील ताण कमी होणार आहे.
चाैकट
सहा तासांची ड्युटी
मिरज कोविड रुग्णालयात चारशे रुग्णांसाठी १७ वाॅर्ड असून त्यापैकी सहा अतिदक्षता विभाग आहेत. डाॅक्टरांना सहा तासांची ड्युटी असून प्रत्येक वाॅर्डात चोवीस तासांसाठी ४ डाॅक्टर व पर्यायी व्यवस्था म्हणून २ डाॅक्टर असे सहाजण काम करतात. डाॅक्टरांना सात दिवस काम केल्यानंतर तीन दिवस सुट्टी देण्यात येते. अतिदक्षता विभागात प्रत्येक तासाला तीन डाॅक्टरांची आवश्यकता आहे. आता प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांना प्रशिक्षण देऊन कोविड उपचारासाठी नियुक्त करण्यात येत आहे.