इस्लामपुरात वाहतूक कोंडी आवाक्याबाहेर
By Admin | Updated: April 28, 2015 00:21 IST2015-04-27T23:08:30+5:302015-04-28T00:21:17+5:30
नगराध्यक्षच हतबल : विरोधी पक्षनेत्यांकडून राजीनाम्याची मागणी

इस्लामपुरात वाहतूक कोंडी आवाक्याबाहेर
अशोक पाटील- इस्लामपूर --इस्लामपूर शहरातील मुख्य चौका—चौकात वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागते. ही वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. विशेषत: रविवारी व गुरुवारी या आठवडी बाजारादिवशी अजिंक्य बझार, वाळवा बझारसमोरील रस्त्यावरच बाजारात येणारे व्यापारी, ग्राहक आपली वाहने लावतात. या वाहनांवर कोणीही कारवाई करत नाही. उलट व्यापारीच पालिका पदाधिकाऱ्यांना आणि पोलिसांना दम देतात. वाहतूक समस्येची जबाबदारी नियोजन समितीचे सभापती खंडेराव जाधव घेत नाहीत. तसेच नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी हात झटकून रिकामे होतात. या दोघांनीही राजीनामे द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी केली आहे.
शहरातील वाहतूक कोंडी आणि मुख्य रस्त्यावर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करुन मांडलेल्या साहित्यामुळे चौका-चौकात वाहनांची मोठी गर्दी होत आहे. यावर उपाय म्हणून नियोजन समितीचे सभापती खंडेराव जाधव यांनी पुढाकार घेऊन दोन बैठका घेतल्या. तरीसुध्दा वाहतुकीचे नियोजन झाले नाही. त्याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता, ही माझ्या एकट्याची जबाबदारी नाही, ही जबाबदारी पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी आणि मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांचीही आहे. त्यांनी मला पूर्ण अधिकार द्यावेत, मग बघा माझ्या कामाची पध्दत, असे स्पष्ट करुन त्यांनी आपली जबाबदारी झटकली.
नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी तर, बघू, करतो, पाहू असे जुजबी उत्तर देत वाहतुकीचे नियोजन खंडेराव जाधव आणि नियोजन समितीतील सदस्यांवर आहे, असे स्पष्ट करीत स्मितहास्य करीत आपली जबाबदारी झटकली. सूर्यवंशी यांना नगराध्यक्षपद मिळाल्यापासून त्यांनी शहरातील नावाजण्यासारखे एकही काम केले नसल्याबद्दल नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे.
गुरुवारी आणि रविवारी या आठवडा बाजारादिवशी अजिंक्य बझार, वाळवा बझारसमोर जीवघेणी वाहतुकीची कोंडी होत असते. याठिकाणी दोन वाहतूक पोलीस नेमणुकीस असतात. परंतु त्यांच्याकडून येथील वाहनांची व्यवस्था लावणे शक्य होत नाही. रस्त्यावर बसलेल्या व्यापाऱ्यांकडून नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी अवाच्या सवा भाडे बेकायदेशीरपणे उकळतात. त्यामुळे त्यांच्यावर कोणीही कारवाई करत नाही.
वाहतूक नियोजनासाठी बैठक घेऊ..!
वाहतुकीसंबंधात पालिकेच्या सभागृहात दोन बैठका होऊनही, परिस्थिती जैसे थे आहे. नेहमीप्रमाणेच प्रत्येक महत्त्वाच्या चौकात वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बनली आहे. याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना विचारले असता, पुन्हा बैठका घेऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावू, असे जुजबी उत्तर देऊन त्यांनीही आपली जबाबदारी झटकली.
वाहतूक नियोजन खर्चाला मंजुरी देण्यासाठी आम्ही विरोध केला होता. सभागृहाने मात्र त्याला मान्यता दिली. खर्च करुनही वाहतुकीची समस्या जैसे थे आहे. यावर कोणतीही कडक कारवाई होत नाही. त्यामुळे याची जबाबदारी स्वीकारून नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी आणि सभापती खंडेराव जाधव यांनी राजीनामे द्यावेत.
- विजय कुंभार, विरोधी पक्षनेते.