सलगरेत रस्त्यावरील बाजाराने वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:22 IST2021-02-15T04:22:54+5:302021-02-15T04:22:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सलगरे : सलगरे (ता. मिरज) येथे सोमवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात परिसरासह कर्नाटक सीमेवरील नागरिकही हजर राहतात. ...

सलगरेत रस्त्यावरील बाजाराने वाहतूक कोंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
सलगरे : सलगरे (ता. मिरज) येथे सोमवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात परिसरासह कर्नाटक सीमेवरील नागरिकही हजर राहतात. यामुळे येेथे प्रचंड गर्दी होत असते. अशा परिस्थितीत मुख्य मर्गावरच हा बाजार भरत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या नित्याची बनली आहे. त्यातच ऊस वाहतूक करणारी वाहने नागरिकांची मोठी डोकेदुखी ठरत आहे.
सलगरे येथील आठवडा बाजारासाठी स्वतंत्र जागा नसल्याने तो गावातील मुख्य रस्त्यावरच भरतो. बाजाराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे बाजाराच्या जागेची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना वाहन चालविताना अडचणी निर्माण होत आहेत.
वाहनांच्या पार्किंगची समस्याही भेडसावू लागले आहेत. त्यामुळे बाजारासाठी स्वतंत्र जागेची आवश्यकता निर्माण झाली आहे. भागातील प्रवासी व शेतमालाचे वाहतूक करणाऱ्या वाहनांची सोमवारी मुख्य रस्त्यावर कोंडी होऊ लागली आहे. शिवाय सोमवारी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसलाही गावात येण्यासाठी अनेक अडथळे पार कारावे लागत आहेत.
रस्त्याकडेला बाजार भरत असल्याने धुळीमुळे भाजीपाला फळे व खाद्यपदार्थांची सुरक्षितता धोक्यात येते आहे. यासाठी बाजारपेठ मुख्य रस्त्यापासून दूर स्वतंत्र जागेत भरणे गरजेचे आहे.
शिवाय बाजारा दिवशी खराब झालेला भाजीपाला व इतर साहित्य रस्त्यावर पडून राहिल्याने अस्वच्छतेचा प्रश्न तयार होतो. त्यामुळे स्वतंत्र भाजीपाला मार्केटची उभारणी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
फोटो-संग्रही फोटो वापरणे