जत शहरात वाहतूक कोंडीची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:05 IST2020-12-05T05:05:47+5:302020-12-05T05:05:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जत : जत शहर व विजापूर ते गुहागर राज्य मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ...

जत शहरात वाहतूक कोंडीची डोकेदुखी
लोकमत न्यूज नेटवर्क
जत : जत शहर व विजापूर ते गुहागर राज्य मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परंतु प्रशासकीय पातळीवर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. यामुळे प्रशासनाच्या कारभाराबद्दल नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
जत शहरातील महाराणा प्रताप चौक, सोलनकर चौक, बसवेश्वर चौक, गांधी चौक, वाचनालय चौक व दगडी पूल ते जयहिंद चौक ही जत शहरातील प्रमुख बाजारपेठ आहे. येथील रस्त्यावरच भाजीपाला विक्रेते बाजूला बसलेले असतात. याशिवाय हातगाडीवाले, फेरीवाले व इतर विक्रेतेही सतत फिरत असतात. अशातच किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांचा माल दुकानात उतरण्यासाठी अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
राजकीय दबाव व सतत हस्तक्षेप होत असल्याने वाहतूक पोलीस कारवाईकडे कानाडोळा करत आहेत. याशिवाय नागरिक मिळेल त्या जागेवर वाहने पार्किंग करून खरेदीसाठी जातात. यामुळेही वाहतूक कोंडी होत आहे.
विजापूर ते गुहागर राज्य मार्गावरील सोलनकर चौक ते बसवेश्वर चौकदरम्यानचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या बाजूलाही वाहने अस्ताव्यस्त उभी असतात. जत बसस्थानकासमोरील बाजूस खासगी प्रवासी वाहने रस्त्याच्या मधोमध उभी करून प्रवासी भरतात. त्यामुळेही वाहतूक कोंडी होते.
चाैकट
जत शहरासह राज्य मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस व जत नगरपालिकेने स्वतंत्र आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. जत शहरात पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी माजी नगरसेवक परशुराम मोरे यांनी केली आहे.
फोटो-०३जत०१
फोटो ओळ : जत शहरात रस्त्याकडेला भाजीपाला विक्री केली जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.