सांगलीत पाऊण तास वाहतूक ठप्प
By Admin | Updated: March 22, 2015 00:22 IST2015-03-22T00:22:13+5:302015-03-22T00:22:13+5:30
वाहनधारकांचे हाल : मुख्य रस्त्यांवर गर्दी

सांगलीत पाऊण तास वाहतूक ठप्प
सांगली : शनिवारच्या बाजारात झालेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे आज शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता हरभट रोड, मारुती रोड, टिळक चौक, गणपती मंदिर आणि आयर्विन पुलावरील वाहतूक ठप्प झाली. तब्बल पाऊण तास शेकडो वाहने या मार्गावर खोळंबल्यामुळे वाहनधारकांचे हाल झाले. वाहतूक पोलीसही जागेवर नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.
सांगलीच्या कापड पेठ, बालाजी चौक या मार्गावर नेहमीप्रमाणे शनिवार बाजार भरला होता. सायंकाळी बाजारात गर्दी झाली. त्याचवेळी गुढीपाडव्यामुळे गणपती मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची, वाहनांचीही संख्या वाढली. सराफ कट्ट्यापासून हरभट रोडकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे या मार्गावर आयर्विन पुलापर्यंत आणि महापालिका, मारुती रोड या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. या मार्गाला जोडणाऱ्या सर्व उपमार्गांवर वाहतूक ठप्प झाली. तब्बल पाऊण तास वाहने गर्दीत अडकली होती. त्यामुळे वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले. वाहतूक पोलीसही नसल्याने गोंधळ वाढला. गणपती मंदिरापासून टिळक चौकापर्यंत, टिळक चौकापासून सांगलीवाडीपर्यंत, मारुती रोड, हरभट रोड अशा प्रत्येक मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अवजड वाहनांना बंदी असूनही आयर्विन पुलावर अवजड वाहनेही गर्दीत होती. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास अडचणी आल्या. विक्रेते, हातगाडीवाले आणि व्यवसायिकांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे याठिकाणचे सर्व मार्ग सध्या अरुंद बनले आहेत. (प्रतिनिधी)